बनावट दारूची आंतरजिल्हा तस्करी उघड
राजेगाव, ता. ८ : राजेगाव (ता. दौंड) येथे बनावट देशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क, दौंड-२ विभाग यांनी धडक कारवाई करत पर्दाफाश केला. या कारवाईत पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन महागड्या वाहनांसह एकूण २० लाख ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ३ आरोपींना अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क, दौंड-२चे पथक पेट्रोलिंग करत असताना राजेगाव येथून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावरून पथकाने राजेगाव- भिगवण रस्त्यावर शिंग्रोबामाळ परिसरात सापळा रचला. यावेळी एका मारुती स्विफ्ट मोटारीमधून (क्र. एमएच १६ डीसी ७९५५) संशयास्पदरीत्या वाहतूक होताना आढळली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ‘टॅंगो पंच’ देशी दारूच्या १५०० बनावट बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी चालक उमेश सुरवसे आणि सुयोग जंजिरे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीत त्यांनी हा माल अहिल्यानगर जिल्ह्यातील कुळधरण (ता. कर्जत) येथून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने तातडीने कुळधरण येथे धाव घेतली. तेथे आरोपी राहुल सुपेकर याच्या घरासमोर उभ्या असलेल्या हुंडाई क्रेटा मोटार (क्र. एमएच १६ डीस ६८०८) गाडीत देशी दारूच्या १३०० बनावट बाटल्या आढळून आल्या. तसेच, पुढे ‘हॉटेल सागर ढाबा’ येथे छापा टाकून आणखी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ३४०० देशी दारूच्या (टॅंगो पंच) बनावट सीलबंद बाटल्या, विविध ब्रँडची विदेशी दारू, एक स्विफ्ट मोटार, एक क्रेटा मोटार आणि मोबाईल, असा एकूण २० लाख ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उमेश हरिश्चंद्र सुरवसे (वय २३, रा. सोनाळवाडी), सुयोग नाना जंजिरे (वय २६, रा. पिंपळवाडी) आणि राहुल पांडुरंग सुपेकर (वय ३०, रा. कुळधरण) या तिघांना अटक केली. मुख्य सूत्रधार मुरलीधर सायकर आणि अमोल दानवले यांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक (तपास अधिकारी) प्रदीप झुंजरुक, दुय्यम निरीक्षक मयुर गाडे, दिनेश ठाकूर, जवान दत्तात्रेय साळुंके (फिर्यादी), संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोंपे, गोपाल कानडे, शुभम भोईटे, वाहनचालक केशव वामने या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

