भैरवनाथ विद्यालयात विजेत्या खेळाडूंना सायकलींचे वाटप
राजेगाव, ता. १३ ः सासवड येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खडकी (ता. दौंड) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील यश संपादन केलेल्या यशस्वी खेळाडूंना दहा सायकलींचे वाटप करण्यात आले.
पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, निरलॉन फाउंडेशन ट्रस्ट मुंबई आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या निधीतून सायकल वाटप करण्यात आले. त्यासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी पाठपुरावा केला होता.
यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष किरण काळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश नवले, अनिल गुणवरे, निलेश शितोळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेला सतत मदत करणारे सचिन काळभोर यांचे किरण काळे यांनी आभार मानले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रकाश नवले यांनी दिले. सूत्रसंचालन ए. बी. देवकाते यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक आय. जी. खान मानले.

