कारवाई करा, अन्यथा पदांचे राजीनामे देणार

कारवाई करा, अन्यथा पदांचे राजीनामे देणार

Published on

शिनोली, ता. १० : कोंढवळ (ता. आंबेगाव) पश्चिम आदिवासी भागातील पैसा ग्रामपंचायतीत मनमानी कारभार चालला आहे. याबाबत चौकशीची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे सदस्यांनी केली. पण, अद्याप कारवाई झालेली नाही. जर कारवाई झाली नाही तर याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आणि उपसरपंच, सदस्य राजीनामे देणार आहेत, असे निगडाळे कोंडवळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन लोहकरे, सदस्या सविता दाते यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सर्वात महत्त्वाची ग्रुप ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्‍या कोंढवळ, निगडाळे, तेरूंगण, भीमाशंकर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कामे, खर्च करत आहेत. अनेक वेळा मासिक बैठकीत निर्णय होऊन देखील ग्रामसभा घेतली जात नाही. बहुतेक वेळा सरपंचांचे पती जवळच्या ठेकेदारांना कामे देतात. उपठेकेदार नेमणूक न करता परस्पर कामे सुरू करून गैरप्रकार व निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. याबाबत सदस्यांनी विचारणा केली, तर उडवाउडवी करत धमकावले जाते, असे सदस्यांनी मासिक बैठकीत तसा ठराव ग्रामपंचायत रजिस्टरला नोंद केला आहे.

निगडाळे- कोंढवळ ग्रामपंचायत सदस्या सविता दाते यांनी ग्रुप ग्रामपंचायतीमधील विकास कामे व आर्थिक व्यवहाराबाबतची माहिती मागितली. पण, ती माहिती देता येत नाही, असं उत्तर दिली. त्यामुळे सदस्या दाते यांनी माहिती अधिकारात ७ डिसेंबर २०२३ रोजी माहिती मागितली. त्याची माहिती अधिकार फी दोन हजार ३६२ रुपये सदस्या भरण्यास तयार असून देखील ग्रामसेवक जनमाहिती अधिकारी युवराज मते चलन भरून देण्यास टाळाटाळ करत असल्याने याबाबतची लेखी तक्रार १८ जून रोजी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्याकडे केली. तरीदेखील कारवाई झाली नसल्याचे सविता दाते यांनी सांगितले.

असा आहे आरोप
दरम्यान लेखी निवेदन व ग्रामपंचायत मासिक बैठकीतील ठरावासह तक्रार वारंवार गटविकास अधिकारी यांना
देऊन ते पाठीशी घालत असल्याचा आरोप उपसरपंच नितीन लोहकरे, सदस्या सुरेखा लोहकरे, यशोदा कोंढवळे, सविता दाते, इंदूबाई कवटे, लक्ष्मी लोहकरे, नामदेव कोंढवळे यांनी केला आहे.

मी गेले दोन वर्षांपासून निगडाळे -कोंढवळ ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे करीत असून राजकीय द्वेषाच्या उद्देशाने माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझे पतीने कधी ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही. परंतु, मी चांगले केलेले काम त्यांना पाहवत नाही. योग्य वेळी मी योग्य उत्तर देईन.
- सविता तिटकारे-कोकाटे, सरपंच, निगडाळे-कोंढवळ ग्रुप ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.