इंदापूरमध्ये बेकायदा होर्डिंग, सांगाडे ठरताहेत धोकादायक

इंदापूरमध्ये बेकायदा होर्डिंग, सांगाडे ठरताहेत धोकादायक

संतोष आटोळे, सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १५ : मुंबईतील धोकादायक होर्डिंगमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असेन काही जण गंभीर जखमी झाले आहेत. इंदापूरमध्येही बहुसंख्य होर्डिंग्ज बेकायदा असून वादळात या होर्डिंग्जमुळेही दुर्घटना घडू शकते. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये फ्लेक्स लावण्यासाठी उभे केलेले सांगाडेही धोकादायक ठरत आहेत. दरम्यान इंदापूर पंचायत समितीचे प्रवेशद्वारही बेकायदेशीर फ्लेक्सच्या विळख्यात असून त्या ठिकाणाहून रोज येणारे जाणारे अधिकारी पाहत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मुंबईसारखी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान शहरातील किती होर्डिंग्जला परवानगी आहे. याबाबत माहिती उपलब्ध नसून यामुळे होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट हा विषय तर कोसो दूरच आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
इंदापूर शहर व तालुक्यामध्ये पुणे - सोलापूर महामार्गावर एकूण ५०हून अधिक होर्डिंग्ज असून किती होर्डिंगला परवानगी आहे, याबाबत माहिती उपलब्ध नाही. यामुळे एकाही होर्डिंगला रीतसर परवानगी घेतली नसल्याची बाब समोर येत आहे. मुंबईतील दुर्घटनेनंतर इंदापूर शहरातील सर्व होर्डिंगधारकांना इंदापूर नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये त्यांची परवानगी, स्ट्रक्चरल ऑडिट याबाबतचा खुलासा करण्याचे नमूद केले आहे.

इंदापूर शहरासह पुणे - सोलापूर महामार्गावर, बाह्यवळण मार्गावर, शहरातील अनेक इमारती, बस स्थानक परिसर, शाळा महाविद्यालये, शहरात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. अनेक होर्डिंग्ज महामार्गालगत असून वादळामुळे दुर्घटना घडल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जिवावर बेतू शकते. मोठ्या आकाराची होर्डिंग्ज अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.

इंदापूर शहरातील सद्यःस्थिती
- खासगी जागेत होर्डिंग पण स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेली नाही
- फ्लेक्स लावण्याबाबत नियंत्रणाचा अभाव
- वादळी वारा, पावसात फ्लेक्समुळे अनेक छोट्या-मोठ्या दुर्घटना
- फ्लेक्स लावण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काही जणांची मक्तेदारी
- अनधिकृत होर्डिंग धारकाकडून भाडेही आकारले जातेय
- फ्लेक्स उतरवले तरी धोकादायक सांगाडे जागेवरच

हे करण्याची गरज
- नगरपरिषदेने अनधिकृत फ्लेक्स व सांगाड्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक
- बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांकडून पूर्वलक्षी प्रभावाने वसुली
- कायदेशीर बाजू व सुरक्षितता दोन्हींची जबाबदारी निश्चित करावी
- स्ट्रक्चरल ऑडिट तपासणे आवश्यक

शिक्षण संस्था, राजकीय नेत्यांची बॅनरबाजी
इंदापूर शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी तसेच खासगी इमारतींवर होर्डिंग्जच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि मोठमोठ्या शिक्षण संस्था यांची बॅनरबाजी जोमात सुरू आहे. याला परवानगी आहे की राजकीय पुढाऱ्यांमुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे याची चौकशी करणे आवश्यक आहे. याबाबत होर्डिंग्ज असलेले जागा मालक, होर्डिंग मालक, राजकीय नेते, शिक्षण संस्था यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे.

बेकायदेशीर फ्लेक्सबाजीची स्पर्धा
इंदापूर शहरात मोठ्या होर्डिंगसह राजकीय पक्षांचे नेते, वाढदिवस शुभेच्छा, निवड नियुक्ती, शुभारंभ, उत्पादन जाहिरात याबाबत सार्वजनिक ठिकाणी परवानगी न घेता फ्लेक्स उभे केले जात आहेत. यात बाबा चौक, बस स्थानक परिसर, न्यायालयासमोरील परिसर, नगरपरिषद समोरील परिसर, इंदापूर महाविद्यालयासमोरील परिसर येथे सार्वजनिक जागांचा समावेश आहे. पंचायत समितीचे प्रवेशद्वारही यामधून सुटलेले नाही. यामुळे नगरपरिषद, पोलिस
प्रशासन, पंचायत समिती, तहसील प्रशासन यांनी संयुक्तरित्या याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे

इंदापूर शहरातील होर्डिंग्जबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, खुलासे मागवण्यात आले आहेत तसेच अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार आहे.
रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com