उजनी जलाशयात बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू

उजनी जलाशयात बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू

इंदापूर, ता. २३ ः उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी (ता. २१) प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेले सर्व सहा प्रवाशांचे मृतदेह तब्बल ३६ तासानंतर नैसर्गिकरित्या पाण्यावर तरंगत वर आले. मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी जलाशयातून बाहेर काढत पुढील कार्यवाहीसाठी करमाळा येथे दाखल केले. दरम्यान, मृतदेह पाहताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे गावात राहणारे गोकूळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (वय, ३०) त्यांची पत्नी कोमल गोकूळ जाधव (वय, २५) लहान मुलगा समर्थ गोकूळ जाधव (दीड वर्ष), मुलगी वैभवी गोकूळ जाधव (वय, ३) हे संपूर्ण कुटुंब तसेच सोलापूर येथे कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे, करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचे पुत्र गौरव धनंजय डोंगरे (वय, २४) व बोट चालक अनुराग अवघडे (वय २६) असे सातजण कुगाववरून कळाशीकडे निघाले होते. प्रवास करीत बोट नदीपात्रातील ऐतिहासिक इनामदार वाड्याच्या परिसरात आले असताना, अचानक सुटलेला जोरदार वादळाचा तडाखा आणि वळिवाच्या तुरळ पावसामध्ये ही बोट उलटली. या वेळी पोलिस अधिकारी असलेले राहुल डोंगरे हे पोहत तळाशीच्या दिशेने आले. इतर तीन पुरुष एक महिला व दोन बालके असे सहाजण बेपत्ता झाले होते. घटना घडल्यानंतर काहीवेळ तसेच बुधवारी संपूर्ण दिवस एनडीआरएफचे पथक, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी जलाशय पात्रात शोध घेतला. मात्र, काहीच हाती लागले नव्हते. त्यानंतर सायंकाळी वारा सुटल्याने तसेच अंधार पडू लागल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. गुरुवारी (ता. २३) पुन्हा सुरू करण्यात आली.
दरम्यान, घटनेला ३६ तासांपासून अधिकचा कालावधी उलटलेला असल्याने गुरुवारी सकाळी इनामदार वाड्याच्या परिसरातच सहा बेपत्ता प्रवाशांपैकी पाच प्रवासी यामध्ये दोन पुरुष एक महिला व दोन बालके यांचे मृतदेह पाण्यावर नैसर्गिकरित्या तरंगत वर आले. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या जवानांनी तिकडे कूच करत मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेतून बेपत्ता असलेल्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सर्व मृतदेह एनडीआरएफ जवानांनी पाण्यातून बाहेर काढून किनारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथे नेले. तेथून करमाळा येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठवले.

गौरवची मृत्यूशी झुंज अपयशी...
या घटनेत सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत बाहेर आले. त्यांच्या मागोमाग त्यांचा चुलत भाऊ गौरव डोंगरे हाही पोहत येत होता. मात्र, वादळी वारे, घटनास्थळ आणि किनारा यामधील अंतर, आणि किनारी भागात साठलेला गाळ यामुळे गौरवचा किनाऱ्यापासून काही अंतरावरच दम सुटला असावा. ज्या ठिकाणाहून राहुल डोंगरे बाहेर आले. त्याच्याच मागे काही अंतरावर गौरवचा मृतदेह मिळाला.

यापूर्वी घडलेल्या घटना...
- १९९३ मध्ये उजनी जलाशयात करमाळा तालुक्यातील टाकळी येथून पळसदेवकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या होडीचा अपघात होऊन २६ जणांचा अंत झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद तेव्हा उमटले होते.
- इंदापूर तालुक्यातील उजनी बॅक वॉटर परिसरात माळशिरस तालुक्यातील दहा डॉक्टर १ मे २०१७ रोजी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी ४ डॉक्टरांवर नियतीने घाला घातला होता. तेव्हाही जोरदार वाऱ्यामुळे आणि बोटीत सेल्फी काढण्याच्या नादात होडी नदीत बुडाल्याने चार जणांना जीव गमवावा लागला होता.
- करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नकार्यासाठी आलेल्या अकलूज येथील बाप-लेकाचा उजनी जलाशयात होडी उलटून मृत्यू झाला होता. ही घटना मार्च २०२१ मध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जॅकवेलजवळ घडली होती.
- जानेवारी २०२२ मध्ये मुंबईहून करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे साखरपुड्यासाठी आलेल्या मच्छीमारांचे दोघे नातेवाईक होडीतून फेरफटका मारताना त्यातील एकजण घसरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली, त्यावेळी बुडणाऱ्याने
वाचवणाऱ्याच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले.

(ः सर्व फोटो रेडी आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com