

इंदापूर, ता. २७ : रजा मंजूर केली नाही म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इंदापूर आगाराचे व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांना त्यांच्याच कार्यालयात त्यांच्या विभागाच्या कर्मचाऱ्यानेच मारहाण केली. याप्रकरणी इंदापूर आगारातच पाळी प्रमुख म्हणून काम करणाऱ्या गोकूळ रामचंद्र जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात आगार व्यवस्थापक हनुमंत गंगापुरी गोसावी (वय ५१, सध्या रा. एस.टी. क्वॉर्टस राजेवलीनगर, इंदापूर; मूळ रा. थेरगाव) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोकूळ रामचंद्र जाधव (रा. माळेगाव, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोसावी हे सोमवारी (ता. २६) सकाळी बस स्थानक प्रमुख संजय सर्जेराव वायदंडे, वाहतूक नियंत्रक निवृत्ती घनवट व लिपिक तौसीफ शहाबुद्दीन शेख यांच्या समवेत आगार व्यवस्थापक दालनात दैनंदिन आढावा बैठक घेत होते. त्यावेळी इंदापूर एसटी डेपोमध्ये पाळी प्रमुख म्हणून काम करत असलेला गोकूळ जाधव तेथे आला. ‘माझा रजेचा अर्ज त्वरित मंजूर करा’ असे त्याने गोसावी यांना सांगितले. त्यावर गोसावी यांनी, ‘मिटींग झाल्यानंतर या’ असे सांगितल्यावर जाधव याने चिडून गोसावी यांना अर्वाच्य शिवीगाळ करून, ‘तू माझे वाटोळे केले आहे. तुला बघून घेतो. तुला खल्लास करतो,’ अशी धमकी देऊन दालनातील खुर्चीने त्यांना मारहाण केली. मिटींगला उपस्थित असणाऱ्यांनी जाधव याच्या तावडीतून गोसावी यांना सोडवले. यामध्ये गोसावी यांच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर, डाव्या हाताच्या मधल्या बोटावर जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर गोसावी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.