दोन महिन्यांत एक कोटी ८२ लाख युनिट वीजनिर्मिती
संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता.३ : उजनी धरण सध्या ११० टक्क्यांपर्यंत भरले असून, धरणात दौंडवरून सहा हजार क्यूसेकची आवक सुरू आहे. सध्या भीमा नदी पात्रात १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज एक हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. धरणातून चार ऑगस्ट २०२४ पासून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडणे सुरू झाल्याने सुमारे १ कोटी ८२ लाख युनिट वीज तयार झाली असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटींहून अधिक आहे.
उजनी धरण यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उणे पातळीतील होते.त्यानंतर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या १० ते १२ दिवसांत १०० टक्के भरले आणि ४ ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीसह कालवा, बोगदा व उपसा सिंचन योजनांमधून अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले ते सगळे पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. समाधानकारक बाब म्हणजे धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाल्यापासून उजनी येथील विद्युत निर्मिती प्रकल्पातून दररोज तीन लाख युनिट (प्रतितास १,२५,०००युनिट) विजेची निर्मिती होत आहे.
‘महावितरण’कडून ही वीज साधारणतः साडेतीन रुपये प्रतियुनिट या दराने खरेदी केली जाते. यंदाच्या पावसाळ्यात त्या प्रकल्पातून साडेतीन कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. पण, जून-जुलैपर्यंत धरण उणे साठ्यात असल्याने त्या काळात वीजनिर्मिती होऊ शकली नाही. वीज तयार करण्यास ४ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वी पावसाचा खंड पडला होता. त्यावेळी दोन दिवस तांत्रिक कारणास्तव वीजनिर्मिती बंद होती. आता पुन्हा वीजनिर्मिती सुरू झाली आहे.
दोन महिन्यांत सोडले १०५ टीएमसी पाणी
उजनी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडून देण्यात आले. यामध्ये ४ ऑगस्टपासून आतापर्यंत धरणातून तब्बल १०५ टीएमसी पाणी नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले आहे.
उजनी धरणातील सद्यःस्थिती
(५ ऑक्टोबर, दुपारी १२ पर्यंत )
एकूण पाणीसाठा .............१२२.४२ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा .............५८.७६ टीएमसी
धरणातून सोडलेला विसर्ग .............१६०० क्युसेक
उजनीत येणारी आवक .............६०७८ क्युसेक
उजनीत अशी होते वीजनिर्मिती
* प्रकल्पाची खोली जमीन पातळीपासून शंभर फूट खोलीवर
* टर्बाईनच्या माध्यमातून वीजनिर्मिती
* धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते.
* वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात सोडले जाते.
* रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो.
वीज कोठे पाठवली जाते
सोलापूर जिल्ह्यातील भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते तसेच भीमानगर येथून सीना-माढा पंप हाऊसला देखील वीजपुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर येथे तशी व्यवस्था केली आहे.
07324
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

