इंदापुरात अवैध वाळू वाहतूकप्रकरणी कारवाई
इंदापूर, ता. १८ : शहरातील महंतीनगर परिसरात कोणताही परवाना नसताना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असलेल्या टेम्पोचा इंदापूर महसूल आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत पाठलाग करून पकडत कारवाई केली. यामध्ये वाहन चालकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल केला असून, ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विकास लहू जाधव (रा. माळवाडी नं २, ता. इंदापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो मालकाचे नाव आहे.
याबाबत इंदापूरचे ग्राम महसूल अधिकारी अशोक संपतराव पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार (ता. १७) मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरातील महंतीनगर येथे अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असलेला टेम्पो येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. यावर तहसीलदार जीवन बनसोडे व त्यांचे सहकारी, तसेच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने अवैध वाळू भरलेले वाहन भरधाव चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महसूल आणि पोलिस पथकाने चपळाईने पाठलाग करत वाहन गाठले. मात्र, यावेळी वाहन चालकाने अंधाराचा गैरफायदा घेऊन वाहन तेथेच सोडून पळ काढला. त्यानंतर पथकाने वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वाहन (क्र. एमएच १२ ईक्यू ७६४४) व त्यामधील वाळू, असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तहसील कार्यालय येथे नेला.
याप्रकरणी तपासात घेतलेल्या माहितीवरून या वाहनाचा मालक विकास लहू जाधव याच्यासह अज्ञात वाहनचालकाविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पुंडलिक गावडे करत आहेत.
वाहनावर बनावट नंबर प्लेट
अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वाहनाच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सदर नंबरचा वाहन मालक शिरूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामुळे बनावट नंबर प्लेटच्या गाड्या वापरून अवैध कामे केली जात असल्याचे आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

