सत्ता असो अथवा नसो 
विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व 
बाळासाहेब तात्या गावडे

सत्ता असो अथवा नसो विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व बाळासाहेब तात्या गावडे

Published on

सत्ता असो अथवा नसो
विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व
बाळासाहेब तात्या गावडे

बारामती म्हंटल की पवार, या समीकरण...या पवारांच्या बालेकिल्ल्यात वर्षानुवर्षे पवारांच्या राजकीय विरोधात राजकारण करत समाजकारणाला महत्त्व देत सत्ता असो अथवा नसो विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व म्हणजे पारवडी गावचे विकास पुरुष मा. बाळासाहेब (तात्या) गावडे...वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

- सखाराम गावडे (सर), प्राचार्य, कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पारवडी (ता. बारामती)

सन १९९६च्या युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळत अनेक धाडसी निर्णय घेत सहकार सोसायट्या, दूध संस्था, मजुर संस्था यांचे जाळे निर्माण करणारे, सतत सर्वसामान्यांसाठी झटणारे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा वटवृक्ष निर्माण करून देणारे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विशेष निमंत्रित सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत बारामतीच्या पट्ट्यात पक्ष बळकट करण्यासाठी कार्यरत असणारे बाळासाहेब (तात्या) गावडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या, तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वच आजी- माजी पदाधिकाऱ्यांशी असलेल्या आपल्या स्नेह, आपले कौशल्य व पदाचा पुरेपुर वापर करीत मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांच्या माध्यमातून आपले पारवडी गाव प्रगतिपथावर नेत बारामती तालुक्यासह जिल्ह्यात एक मॉडेल तयार केले.
बाळासाहेब (तात्या) गावडे यांनी राजकारणापेक्षा सर्वसामान्यांनी आपले नाते निर्माण करीत लोकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कृषी, शिक्षण, वाणिज्य, व्यापार, सहकार अशा सर्वच क्षेत्रांतील लोकांना तात्या मार्गदर्शक व आपले वाटतात. कारण, या सर्वच क्षेत्रांची त्यांना अगदी जवळून ओळख आहे. लोकांशी दांडगा जनसंपर्क व त्यांची समस्या जाणणारा गुण हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य पैलू सांगता येईल. एकदा संपर्कात आलेल्या माणसाला तात्या सहसा विसरत नाहीत. तात्या बारामती असो, पुण्यात असो वा मुंबईत असो, त्यांच्याकडे जाणारा कार्यकर्ता सहसा निराश होऊन माघारी येत नाही. म्हणूनच प्रगल्भ व परिपक्व राजकारणी म्हणून त्यांचा बोलबाला आहे.
सुरवातीला अनावधानाने राजकारणात आलेल्या तात्यांनी नंतर मात्र राजकारणाबोरबरच समाजकारणाला महत्त्व देत सर्वसामान्यांना आपलेसे केले. आपले सहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पारवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केल्यावर सातवीचे शिक्षण बारामती येथी शाळा क्रमांक पाच येथे घेतले, तर आठवी ते अकरावी हे शिक्षण शाहु हायस्कूल बारामती येथे घेतले. या काळात शालेय प्रतिनिधी निवड होत असताना तात्यांची भूमिका निर्णायक असायची. यामध्ये सलग चार वर्षे तेथे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याकाळातही त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधित्व केले. हे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष न करता सतत पहिल्या- दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत होते.
त्यानंतर पुणे येथील आयएलएस या कायद्याच्या विद्यालयात लॉ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी तात्यांनी आपले पॅनेल तयार केले व ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येत तेथे यश संपादन करीत पहिल्या वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर तात्या ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आपल्या घरी पारवडी येथे आले. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले होते. तो काळ १९७८ चा होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद देण्याऐवजी, ‘अरे, पुण्यात पोरांच्यात कसले राजकारण करतोय? बारामतीच्या राजकारणात उतर,’ असे सांगितले. यावेळी तात्या कोणताही विचार न करता शिक्षण आहे तेथेच थांबवीत पहिल्यादांच १९७८च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तत्कालीन शिर्सुफळ- काटेवाडी या गटातून निवडणुकीला उभे राहिले. संपूर्ण मतदार संघाची माहितीही नसताना तात्यांनी हा धनुष्य उचलला होता आणि त्यांच्या विरोधात उमेदवार होते बारामती पंचायत समितीचे सभापती. अशा वेळी तात्यांच्या शालेय सवंगड्यांनी ही निवडणूक ताब्यात घेत प्रत्येक घरापर्यंत पोहचत तात्यांना विजयश्री मिळवून दिली आणि खऱ्या अर्थाने सन १९७८ मध्ये तात्यांनी राजकारणात प्रवेश केली. त्यावेळी निवडणुका कधी घ्यायच्या, याबाबत कडक कायदे नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेत मुदतवाढ मिळत जवळ जवळ बारा वर्षे त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी अनेक कामे केली. त्यानंतर सन १९९० मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. मात्र तत्कालीन तालुक्यातून राज्यपातळीवर राजकारण करणाऱ्या मुरब्बी राजकारण्यांनी हा मतदार संघ राखीव करून टाकला. अशा वेळी तात्यांनी मोरगाव या नवख्या जिल्हा परिषद गटातून अर्ज भरला व १२ वर्षे जिल्हा परिषद सदस्याच्या कामाच्या व अनुभवाच्या बळावर संबंधित गटाशी कोणताही संबंध नसताना त्यातून बिनविरोध निवड जिल्हा परिषदेवर करण्यात यश मिळविले. बिनविरोध निवडीची ही पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासातील आजपर्यंतची एकमेव घटना ठरली आहे.

कृषी विकासासाठी धडपड
याच काळात तात्यांनी भूविकास बँकेचे संचालक म्हणून बारा वर्षे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून बारा वर्षे, जिल्हा दूध संघाचे संचालक, आदी पदे भूषवीत असताना सर्व सामान्यांची अनेक कामे केली. त्यांच्या या कामाची दखल घेत सन १९९६ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे यांनी बाळासाहेब (तात्या) गावडे यांना कॅबिनेट पदाच्या दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद देत त्यांना कार्याला गती देण्याचे काम केले. या मिळालेल्या संधीचे सोने करीत तात्यांनी आज सर्वत्र चर्चेत असलेली व वशिलेबाजीला चाप लावत सर्वसामान्यांना प्रवेशासाठी न्याय मिळवून देणारी आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया ही पद्धत स्वीकारीत इतरांपुढे प्रवेश प्रक्रियेचा एक आदर्श घालून दिला. याशिवाय कोळंबी गोड्या पाण्यात वाढविण्यासाठीच्या प्रयोगाला चालना असेल किंवा एका झाडांवर कलमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची फळे घेण्याची प्रक्रीया असेल, यांची प्रचिती महामंडळाच्या माध्यमातून सर्वांना करून दिली. तसेच, त्यांच्याच काळात पुण्यातील कार्यालय, शिरवळ येथे महाविद्यालय सुरु करण्यात आले. तसेच बारामती येथे कृषी विद्यालय सुरु करत असताना मान्यता देण्यात तात्यांचाही खारीचा वाटा होता, हे विशेष.

पक्ष वाढीला प्राधान्य
तात्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र प्रदेशच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. यामध्येही त्यांनी कुठेही मागेपुढे न पाहता पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत पक्ष वाढीला प्राधान्य दिले. अशा या हरहुन्नरी नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच, त्यांची राजकीय आणि सामाजिक घोडदौड अशीच सुरू राहो हीच प्रार्थना आणि शुभेच्छा...

(शब्दांकन : समीर बनकर, शिर्सुफळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com