...तर काटा बंद आंदोलन करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर काटा बंद आंदोलन करणार
...तर काटा बंद आंदोलन करणार

...तर काटा बंद आंदोलन करणार

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २८ ः सोमेश्वर कारखान्याने वाढीव शेअर्सपोटी एकरकमी वसुली सुरू केली आहे. वास्तविक तीन टप्प्यात शेअर्सच्या रकमेची वसुली करावी. तसेच ज्या महिन्यात वसुली केली त्याच महिन्यापासून प्रतिशेअर्स पाच किलो साखर वाटपही सुरू करावे. अन्यथा एकरकमी जुलमी कपाती विरोधात प्रसंगी काटा बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या सप्टेंबर २०२१च्या वार्षिक सभेत सभासदांच्या शेअर्सची किंमत दहा हजारांवरून पंधरा हजार करण्यात आली. त्या पाच हजारांची वसुली दोन टप्प्यात केली. आता मात्र ऑगस्ट २०२२मध्ये झालेल्या वार्षिक सभेत अध्यक्षांनी कारखान्यास आर्थिक चणचण भासत असल्याने प्रतिएकर एक शेअर्स असा नियम लागू केला. प्रतिशेअर्स पाच किलो साखर देऊ अशी लालूच दाखविल्याने सभासद बळी पडले. आता ऊस बिलातून सोसायटी, बँका यांची कर्जे वसूल होण्याआधीच एकरकमी शेअर्स कपात केली जात आहे हा अन्याय आहे. ज्या सभासदांचे आधीचेच एकपेक्षा जास्त शेअर्स आहेत. त्यांची अतिरिक्त शेअर्सची सवलत दराने दिली जाणारी साखर बंद केली होती. आयकर खात्याची नोटीस येते आदी कारणे सांगितली होती. मग आता नव्याने वाढीव शेअर्सपोटी साखर दिली जाणार आहे. त्याला साखर आयुक्त व आयकर विभागाची परवानगी लागणार नाही का याचा खुलासा अध्यक्षांनी करावा, असे आवाहन काकडे यांनी केले. कारखान्याची आर्थिक पत ढासळल्याची शंका येत आहे. भागभांडवल उभे करण्याच्या नावाखाली सुरू असलेली कपात प्रकल्प उभारणीच्या स्वनिधीसाठी वापरणार की बांधकामे करणार हे संचालक मंडळाने ठरवावे, असा टोलाही लगावला.
मागील हंगामात एफआरपी उशिरा दिली होती. त्यापोटी विलंब कालावधीचे व्याज देणारा सोमेश्वर पहिलाच कारखाना असल्याचे अध्यक्ष सांगत आहेत. वास्तविक मागील हंगामात शेतकरी कृती समितीनेच साखर आयुक्तांना तक्रार केली होती. याआधीही २००९मध्ये कृती समितीने थकीत एफआरपीवरील व्याज मिळवून दिले होते हे विसरू नये. चालू हंगामातही एफआरपी उशिरा दिली गेली असून त्यावरील व्याजासाठीही १ डिसेंबरलाच साखर आयुक्तांना तक्रार केली आहे, अशी माहिती काकडे यांनी दिली.