कांदा उत्पादकांचे डोळे अनुदानाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा उत्पादकांचे डोळे अनुदानाकडे
कांदा उत्पादकांचे डोळे अनुदानाकडे

कांदा उत्पादकांचे डोळे अनुदानाकडे

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १ : कांद्याची आवक वाढल्याने आणि कांदा निर्यातीत आलेल्या अपयशामुळे कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोचले आहेत. मागील महिनभरात कांद्याचे दर प्रतिक्विंटल सातशे रुपयाने; तर चार महिन्यांत प्रतिक्विंटल सतराशे रुपयांनी उतरले आहेत. लोणंद (जि. सातारा) बाजार समितीत सोमवारी (ता. २७ फेब्रुवारी) उच्च प्रतिच्या कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये; तर मध्यम प्रतिच्या कांद्याला ५०० ते ८०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी मात्र पूर्ण गोत्यात गेला असून, निर्यात प्रोत्साहन आणि अनुदानाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

अशी झाली घसरण
कांद्याचे दुष्टचक्र गेली चार वर्षे सुरूच आहे. यंदा दिवाळीत १० ऑक्टोबरला उच्च प्रतिचा कांदा २७०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत होता, तो नोव्हेंबरमध्ये २००० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून राहिला. डिसेंबर व जानेवारीमध्ये शे-दोनशे रूपयांची घसरण झाली. यानंतर एकट्या फेब्रुवारीत कांद्याचे दर सातशे रूपयांनी घटले. सोमवारी लोणंद बाजार समितीत उच्च प्रतिचा कांदा ८०० ते १०००, मध्यम कांदा ५०० ते ८०० व लहान कांदा ३०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटलने विकला गेला.

‘नाफेड’ची खरेदी किरकोळ
जगभरात टंचाई असताना महाराष्ट्रात मात्र कांदा फेकून देण्याची वेळ निर्माण झाल्याने सरकारी धोरणांवर चोहोबाजूंनी टिका होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन लाख टन कांदा ‘नाफेड’कडून खरेदी होणार असल्याचे सूतोवाच केले. राज्यात तेवढी आवक तीन दिवसातच होते. लाल कांदा खरेदी करण्यात ‘नाफेड’ला कितपत रस असेल याबाबतही शंका आहे. त्यामुळे नाफेड खरेदीने दर वाढण्याची स्थिती सध्या नाही. त्यामुळे निर्यात प्रोत्साहन आणि अनुदानाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

जगभरात टंचाई असताना आपल्याकडे कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे, हे सरकारी अनास्थेचेच फळ आहे. शेतमालांचे भाव कोसळताना सगळे राजकारणात दंग आहेत. जाती-धर्माच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा शेतकरी जीवंत राहण्याकडे लक्ष द्यावे.
- कालिदास आपेट, नेते, शेतकरी संघटना

पिशवी आणि वाहतूक यालाच पिशवीमागे शंभर रूपये खर्च येतो. मशागत, लागवड, औषधे, खते याचा खर्च निघायचा असेल तीस रूपये प्रतिकिलो भाव हवा. पण, प्रतिकिलो वीस रूपयांची गाठ पडेल, इतपत तरी अनुदान द्या.
- संतोष यादव, कांदा उत्पादक, सटलवाडी (ता. पुरंदर)

कांदा बियाण्यास निर्यातबंदी आहे, मात्र कांदा निर्यातीवर कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र, श्रीलंका मोठा आयातदार आर्थिक अडचणीत आहे, तर बांगलादेश कांदा पिकवू लागला असून, डॉलर खर्च करायलाही घाबरत आहे. पाकिस्तानला कांदा पाठवला जात नाही. सध्या दहा ते वीस टक्केच पीक जास्त असेल, पण जी मुख्य निर्यात होत होती, ती होत नाही. आखाती देशात मात्र निर्यात व्यवस्थित सुरू आहे.
- बिपिन शहा, कांदा निर्यातदार

लोणंद बाजार समितीतील कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर (रूपये)

तारीख दर
२७ फेब्रुवारी- ८०० ते १०००
२३ फेब्रुवारी- ८५० ते १०००
१३ फेब्रुवारी- १००० ते १२००
३ फेब्रुवारी- १००० ते १३६०
२३ जानेवारी- १४०० ते १७००
२९ डिसेंबर- १४०० ते १८००
२४ नोव्हेंबर- १७०० ते २०००
२० ऑक्टोबर- १५०० ते २२००
१० ऑक्टोबर- १५०० ते २७००