मृत्यूच्या दाढेतून बैलाची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्यूच्या दाढेतून बैलाची सुटका
मृत्यूच्या दाढेतून बैलाची सुटका

मृत्यूच्या दाढेतून बैलाची सुटका

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १३ ः उसाने गच्च भरलेल्या बैलगाडीचा टायर फुटला आणि गाडी क्षणार्धात पलटी झाली. उडी मारल्याने गाडीवान बचावला, पण एक बैल मात्र उसाखाली अडकला. दहा मिनिटे तो मृत्यूच्या दाढेखाली दबून निपचित पडला होता. मदतगारांनी शिकस्त करीत बैलाला बाहेर काढले. सोमेश्वर कारखान्याजवळ घडलेल्या या अपघाताने मजूर व त्याची मुकी जित्राबे रोज मरणाच्या छायेत कशी राहतात, याचीच वेदनादायक गोष्ट अधोरेखित झाली.

अपघात ऊसतोड मजुरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. कधी कोयत्याचा घाव बसेल, कधी पंक्चर होऊन गाडी पलटी होईल, वाहनांसोबत अपघात होईल किंवा कधी सर्पदंश होईल याचा भरवसा नाही. यात त्यांचा एकमवे मुका सोबती असतो; तो म्हणजे बैल! अपघातावेळी मजुराला तरी उडी टाकत येईल. पण मुक्या जित्राबाचे काय? तोही जुपणीत अडकवलेला असतो. गाडी पलटी झाल्यावर कधी मान मुरगळते, कधी उसाखाली जीव जातो. कधी उताराला पाय फासकटून बैल मरतो... बैलाचे मरण म्हणजे मजुराला दुःख होते ते वेगळेच, पण अख्खा सहा-सात महिन्याचा धंदा बुडीत. बैलाचा पाय दुमडला तरी धंदा संपला अशी गत असते.

आज सोमेश्वर कारखान्यावरची सायंकाळची वेळ. उसाने भरलेली बैलगाडी तळावर पोचायला पाच मिनिटांचाच अवकाश. तेवढ्यात गाडीचा टायर फुटून ‘ठो’ आवाज झाला. अॅक्सल तुटून पडला आणि गाडी पुढच्या क्षणात पलटी झाली. एका बाजूचा बैल लोंबकळून मोकळा झाला. मजूरही बचावला, पण पलटलेल्या बाजूला बैल खाली आणि गाडीतला ऊस त्याच्या अंगावर पडला. अन्य मजूर भावंडाच्या मदतीला धावले. सुरक्षारक्षकांनी जेसीबी व ट्रॅक्टरला पाचारण केले. बैल मोळ्यांखाली निपचित पडलेला. तोवर लोकांनी ऊस बाजूला काढला, पण बैलगाडीची शिवळ बैलाच्या नरड्याजवळ अडकली होती. जुपणीने श्वास गुदमरला होता. जुपणी कोयत्याने तोडली, पण ट्रॅक्टरने बैलगाडी ओढावी तर शिवळीचा फास बसला असता. अखेर वजनदार गाडी मजुरांनी मोठी शिकस्त करून उचलली आणि पुढे ओढली. बैलाची मान मोकळी झाली, पण बैल बेशुद्धच. अंगावरचे पूर्ण ओझे निघल्यावर काही काळाने सावध झाला. मालकाने थाप टाकताच झडझडून उभा राहिला. त्याला चक्कर येऊ नये म्हणून काही क्षण कान डोळ्यावर दुमडले. मात्र सावध झालेला बैल गर्दीस घाबरून बाहेर पळाला!

दहा मिनिटांच्या कालावधीत सगळ्यांचाच उर दडपला होता, परंतु बैलाची सुटका होताच गर्दीनेही सुटकेचा निःश्वास टाकला. गर्दीत माणसे मदतीला धावली म्हणून ठीक. हाच टायर शेतात, डांबरीला फुटला असता तर मजुराची, त्याच्या कुटुंबाची आणि बैलाचीही खैर नव्हती या जाणीवेने काळजात धस्स झाले!
---