शिक्षकदिनीच शिक्षक आंदोलनावर

शिक्षकदिनीच शिक्षक आंदोलनावर

सोमेश्‍वरनगर, ता. ४ : माहित्या व उपक्रमांमध्ये अडकलेले शिक्षक ‘आम्हाला शिकवू द्या’ असा टाहो फोडत असतानाही शासन जागे होत नसल्याने ‘दीन’ झालेल्या शिक्षकांवर अखेर ‘शिक्षकदिनी’ आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. शिक्षकदिनाला (ता. ५) शिक्षक संघाने काळ्या फिती लावून काम करण्याचा, तर शिक्षक समितीने सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राज्य पदवीधर संघटनेने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन निश्चित केले आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, प्रशिक्षण व संशोधन संस्था अशा सगळ्यांचे अनेक उपक्रम याशिवाय महसूल, ग्रामविकास विभागांचे उपक्रम यामध्ये शाळा अडकल्या आहेत. अशात निरक्षरांच्या सर्वेक्षणाची सक्ती केल्याने वातावरण चिघळले आहे. राज्यभरातील शिक्षक संघटनांनी शासनाच्या धोरणांप्रती निषेध व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाचा मुहूर्त निवडला आहे. राजकीय चिखलफेकीत शाळांकडे यानिमित्ताने लक्ष देतील, अशा अपेक्षेने इतिहासात पहिल्यांदाच शिक्षक दिनी आंदोलन होत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याध्यक्ष संभाजीराव थोरात यांनी सांगितले. तर, राज्यभरात शिक्षक एक दिवसाच्या सामूहिक रजेवर जाऊन निषेध व्यक्त करणार आहेत, असे समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी सांगितले. पदवीधरांचे प्रश्न घेऊन शिक्षक दिनी पुणे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा निर्धार अनिल पलांडे यांनी व्यक्त केला.

जी कामे ऑनलाइन करतो, तीच ऑफलाईनही करावी लागतात. रोज माहित्यांचा सपाटा लावला असून, अनेक चाचण्या, उपक्रम यात शाळा व विद्यार्थी भरडून निघाले आहेत. शिक्षकांना अध्यापनास वेळच उरलेला नाही. याशिवाय अनेक अशैक्षणिक कामे व जिल्हा परिषदेची दफ्तर दिरंगाई यामुळेही शिक्षक वैतागलेले आहेत. त्यामुळे शिक्षक दिनी शिक्षक दीन झाला आहे.
- बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ

शिक्षकांची ऑनलाइन व अशैक्षणिक कामांतून मुक्तता करणे, रिक्त जागा तातडीने भरणे, वेतन आयोगाची थकबाकी मिळणे, विद्यार्थी उपस्थिती भत्ता वाढविणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुख्यालयी राहण्याची अट वगळणे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदांवर १७ जुलैला धरणे धरले, वरिष्ठ कार्यालयांना निवेदने दिली, मात्र दुर्लक्षच होत असल्याने शुभदिनी लढावे लागत आहे.
- सुनील वाघ व कोषाध्यक्ष बाळासाहेब लांघी, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

जिल्ह्यात २३२ पेक्षा अधिक प्राथमिक शाळांवर मुख्याध्यापक पद रिक्त आहे. जिल्हा परिषदेने सन २०१० पासून शिक्षकांची तेरा वर्षे मुख्याध्यापकपदी पदोन्नतीच केली नाही. संघटनेकडून वारंवार चर्चा, भेटी, निवेदने दिली. आता नाइलाजाने शिक्षकदिनी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करत आहोत.
- शांताराम नेहेरे, जिल्हाध्यक्ष,पदवीधर, शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com