ड्रोनच्या रात्रीच्या घिरट्यांनी उडवली झोप

ड्रोनच्या रात्रीच्या घिरट्यांनी उडवली झोप

सोमेश्वरनगर, ता. १ : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावकऱ्यांची रात्रीच्या वेळी घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे शब्दशः झोप उडाली आहे. लोणी भापकर, कोऱ्हाळे परिसरात दंगा घातल्यानंतर शुक्रवारी रात्री करंजेपूल व वाणेवाडी गावांवर ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे लोक भयभीत आणि संभ्रमित आहेत. पोलिस प्रशासन याबाबत तपासाच्या अंतिम टप्प्यात असून, गुन्हा करण्यासाठी ड्रोन वापरले जात नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अनेक गावांवरून अज्ञात ड्रोन फिरत असल्याच्या बाबी गेले आठवडाभर घडत आहेत. बारामती शहराजवळ सुरवातीला ड्रोन फिरले आणि काही काळ त्यांनी दौंडकडे मोर्चा वळविला. आता आठवडाभरात मोरगाव, आंबी, कुतवळवाडीवरून ड्रोन फिरले. त्यानंतर लोणी भापकर, मुढाळे, कोऱ्हाळे, वडगाव निंबाळकर या गावांचा नंबर लागला. पाठोपाठ वडगाव निंबाळकर व मुढाळे गावात पाच घरफोडीचे प्रकारही घडले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या करंजेपूल आणि वाणेवाडी गावांवरून ड्रोन फिरले. अचानकपणे आलेल्या ड्रोनने नागरिकांची झोप उडाली. दोन्ही गावातील तरुण रस्त्यावर आले होते, मात्र ड्रोन उडत उडत पुढे गेले. रात्रभर नागरिकांना जागता पहारा ठेवावा लागला. आज दिवसभर बाजारपेठेत हीच चर्चा झडत होती.
या पार्श्‍वभूमीवर ज्या घरांमध्ये लग्न अथवा अन्य समारंभ आहेत ते अधिकच तणावग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अथवा प्रशासनाकडून कसलाही खुलासा होत नसल्याने संभ्रमात भर पडली आहे. बहुधा छोटी विमाने तयार करणाऱ्या कंपनीकडून या चाचण्या सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नागरिकांना पडलेले प्रश्‍न
- पोलिसांनी, महसूलने की महावितरणने ड्रोन पाठविले आहे?
- ड्रोन पाठवून चोरटे माहिती तर गोळा करत नाहीत ना?
- जनावरांना, मुलाबाळांना दगाफटका तर होणार नाही ना?


गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे ड्रोन फिरत नाहीत, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या अफवेचा चोरटे गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच खुलासा केला जाईल.
- पांडुरंग कन्हेरे, पोलिस उपनिरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com