घिरट्या घालणारे ड्रोन नव्हे छोटी विमाने?

घिरट्या घालणारे ड्रोन नव्हे छोटी विमाने?

सोमेश्वरनगर, ता. २ ः रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणारे यंत्र ड्रोन नव्हे तर छोटी विमाने असण्याची शक्यता आहे. यास पोलिस प्रशासनाने दुजोरा दिली आहे. मात्र. गेल्या पंधरा दिवसांपासून चार तालुक्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना बारामतीतील संबंधित विमान कंपनी झोपा काढते का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील अनेक गावांवरून अज्ञात ड्रोनसदृश यंत्र फिरत आहेत. नेमक्या याच कालावधीत चोरटे सक्रिय झाले. याच दरम्यान वडगाव निंबाळकर, शिरष्णे या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही लक्ष घातले आहे.

वास्तविक ही यंत्रे ड्रोन नसल्याचे चित्र स्पष्ट होत असून पोलिस प्रशासनाकडूनही या गोष्टीला दुजोरा मिळत आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडूनच याचा अंतिम खुलासा होणार आहे. गेले पंधरा दिवस हलकल्लोळ माजलेला असताना संबंधित विमान कंपनी ढिम्म आहे. त्यांना लोकांच्या भावनांचे देणेघेणे नसेल तर कंपनी हद्दपार करा, अशी संतप्त प्रतिक्रिया माणिक शिंदे, लक्ष्मण लकडे यांनी दिल्या आहेत.

‘‘उडत्या ड्रोनच्या उंचीवरून हंड्रेड टाईम्स झूम केले तरी खालचा व्यक्तीसुद्धा दिसणार नाही. घरातील किंवा घराबाहेरील वस्तू दिसणार नाहीत. फक्त एरिया लक्षात येईल. सर्वसाधारण कंपनीचे ड्रोन एक ते दोन किलोमीटर तर सर्वोच्च क्षमतेचे मोठ्या किमतीचे ड्रोन पाच किलोमीटर जाते.
- आदित्य कोंडे, ड्रोन तंत्रज्ञ

ड्रोन नसून छोटे विमान असल्याचीच शक्यता खूप जास्त आहे. सदर यंत्र फिरण्याचा आणि चोरीच्या घटनांचे कुठलेही कनेक्शन आम्हाला आढळलेले नाही. यानिमित्ताने गावांमध्ये अनोळखी लोकांना चोर समजून पकडून मारहाण करू नये. त्यातून विपरीत घटना घडू शकते. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास निम्म्या रात्रीदेखील पोलिसांशी संपर्क करू शकता. चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांसोबत ग्रामसुरक्षा दल, पोलिस
पाटील यांनी सतर्क राहावे. ग्रामस्थांनी आळीपाळीने गस्त घालावी.
- दर्शन दुगड, प्रभारी अधिकारी, वडगाव निंबाळकर

ड्रोन नसल्याचे कारणे
-ड्रोन विशिष्ट उंचीच्या वर जाऊ शकत नाहीत
- ही उडणारे यंत्र लँड झाल्याचे कुणी पाहिलेले नाही
- ड्रोनव्दारे जमिनीवरील बारीक पाहणी अशक्य
- घरांच्या आतील किंवा बाहेरील गोष्टी ड्रोनच्या आवाक्याबाहेर
-लाखाचे ड्रोन वापरून हजारांची चोरी करण्याची शक्यता दुर्मिळ
- ड्रोन सात-आठ किलोमीटर जाऊ शकत नाही
- सर्वसाधारण ड्रोन दोन-तीन तास नव्हे चाळीस मिनिटेच चालतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com