मोकाट गाईंच्या बंदोबस्तासाठी इच्छामरणाचा निर्णय

मोकाट गाईंच्या बंदोबस्तासाठी इच्छामरणाचा निर्णय

सोमेश्वरनगर, ता. ८ : वनविभागाच्या जंगलात राहणाऱ्या सुमारे शंभर मोकाट गाईंच्या कळपाने मोढवे (ता. बारामती) गावासह आसपासच्या चार गावातील शेतीव्यवस्था अक्षरशः उद्‌ध्वस्त केली आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी गेली चार वर्षे वन, पशुसंवर्धन, महसूल विभागांसह आमदार, खासदार, मंत्री यांच्या हातापाया पडून शेतकरी थकले आहेत. मोढवेकरांनी गाईंच्या बंदोबस्तासाठी अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून यानंतरही प्रश्न न सुटल्यास सोमवारी (ता. ८) राज्यपाल व राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोढवेसह मुर्टी, जोगवडी, राख, नावळी या गावांमध्ये शंभर मोकाट गाई व वळूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसभर सात-आठशे एकर वनात हुंदडतात आणि रात्री कळपाने बाहेर पडून शेलकी पिके फस्त करतात. शेतकरी आधीच जिराईतदार आहेत. त्यात त्यांची मका, भाजीपाला, बाजरी, सोयाबीन, कांदा, गहू, ज्वारी, ऊस पिके रातोरात फस्त होत आहेत. कुणी रात्रभर राखण करतेय, कुणी कंपाऊंड केले, कुणी शेती सोडून दिली तर कुणी सालगडी झाले आहेत. एका तरुणास वळूने शिंगावर घेऊन फेकल्याने कळपास कुणी आडवे जाईना. अशात गोवंश हत्याबंदी कायद्याचे भयही शेतकऱ्यांना वाटतेय.

वनअधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तहसीलदार, प्रांत, बीडीओ, सीईओ यांच्या हातापाया पडून झाले. आमदार, खासदारांच्या, गोप्रेमींच्या विनवण्या करून झाल्या. रास्ता रोकोही केले. मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उपसले. असंख्य निवेदने दिली. आलेली रिस्क्यू टीमही गायब झाली. आता चालू खरिपात नव्याने पेरलेली पिके गुडघ्याला लागताच फस्त होऊ लागल्याचे पाहून शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. आज मोढवे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत लोकवर्गणीतून बक्षीस जाहीर केले आहे. व राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना इच्छामरणाची परवानगी मागण्याचा दुर्दैवी निर्णयही घेतला आहे.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर म्हणाल्या की, गाई वन्यप्राणी संवर्गात येत नाही. तरीही वरिष्ठांशी बोलून रेस्क्यू टीमला कळविले आहे.

एकवीस एकराचा शेतकरी झाला खंडकरी
लालासाहेब मोटे म्हणाले, वनविभागास कंपाउंड नसल्याने गाई रात्रीच्या बाहेर पडून रोज पिके फस्त करत आहेत. माझ्या मोटेवाडीतील लोकांनी चारशे एकर शेती करायचीच सोडून दिली. मी दहा एकराचा शेतकरी पण परवाच गायांनी बाजरीचा खुंरदुळा केलाय. आता जगायचं कसं सांगा? खंडाने मोरगावला शेती करतोय. आमच्या जगू खंडू मदने यांनी तर एकवीस एकर रान सोडून दिले आहे.. असे कित्येक आहेत.

गाईंच्या बंदोबस्तासाठी सर्व पातळीवरचा संघर्ष करून झालाय. ग्रामसभेत बक्षीसाचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम झाला नाही तर स्वेच्छामरणाची परवानगी शासनाकडे मागणार आहोत.
- शीतल मोरे, सरपंच, मोढवे

03669, 03670

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com