

सोमेश्वरनगर, ता. २२ : राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी सेवा झालेल्या कनिष्ठ प्राथमिक शिक्षकांना ‘मतदान केंद्राध्यक्ष’ म्हणून नियुक्ती दिली आहे. ती रद्द करण्याची, तसेच मतदान प्रक्रिया होताच महिलांची मतदान केंद्रावरूनच मुक्तता करावी, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेवाज्येष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदान केंद्राध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दरवर्षी बहुतांश प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष न करता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मतदान अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. मात्र, यावेळी सेवाज्येष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांऐवजी तुलनेने कमी सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्राध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर केंद्राध्यक्षासह सर्वच कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी मतदान यंत्र जमा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत तिष्ठत ठेवले जाते.
याबाबत पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे यांच्यासह शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे मतदान केंद्राध्यक्षपदाचे आदेश बदलून त्यांना मतदान अधिकारी क्र. १,२,३ पदी नियुक्ती द्यावी. दुर्धर आजारी, गरोदर अथवा स्तनदा माता यांना निवडणूक कामातून सूट द्यावी. महिला मतदान अधिकाऱ्यांना स्थानिक परिसरात नियुक्ती द्यावी. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना लगेच कार्यमुक्त करावे. स्थानिक तालुका पातळीवरच सर्व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑन ड्यूटी एक दिवसाची सुट्टी द्यावी. मतदानादिवशी कर्तव्यावर असणाऱ्या बी.एल.ओ. यांनाही मतदान अधिकाऱ्याप्रमाणे मानधन भत्ता द्यावा, या मागण्या केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.