

सोमेश्वरनगर, ता. १८ : मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने एफआरपीचे तुकडे करणारा राज्यसरकारचा आदेश रद्द केला आहे. यामुळे एकरकमी एफआरपी मिळणार असल्याचा आनंद येथील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून साजरा केला.
करंजेपूल (ता. बारामती) येथे मुख्य परिसराच्या चौकात शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जमा झाले. या ठिकाणी एफआरपीसंदर्भातील याचिकाकर्ते राजू शेट्टी, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, वकील अॅड. योगेश पांडे, अॅड. सतीश बोरूळकर यांच्या घोषणा देत आभार मानण्यात आले. शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी मदन काकडे, महेश जेधे, प्रसाद सोनवणे, सुरेश शेंडकर, दत्तात्रेय भोईटे, ज्योतिराम जाधव, राहुल चव्हाण, एकनाथ होळकर, लक्ष्मण गावडे, भरत काकडे, विजय पवार, विकास जाधव उपस्थित होते.
राज्यसरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढून घेतला होता. त्याविरोधात आंदोलने करूनही दाद दिली जात नसल्याने न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागला. न्यायालयाने न्याय दिल्यामुळे एकट्या चालू हंगामात कारखान्यांकडून आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना एफआरपीपोटी अधिकचे मिळणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांनी सोमेश्वर कारखान्यावर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांची भेट घेत एकरकमी एफआरपीची मागणी केली.
- मदन काकडे, सरचिटणीस, शेतकरी कृती समिती
सोमेश्वरने एकरकमी एफआरपी द्यावी
सोमेश्वर कारखान्याने प्रतिटन २८०० रूपये पहिली उचल दिली आहे. सोमेश्वरची एकरकमी एफआरपी ३१५० रुपये प्रतिटन आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सोमेश्वर कारखान्याने उर्वरित ३५० रुपये प्रतिटन रक्कम व्याजासह सभासदांना अदा करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना सोसायटी व बँकांची कर्जे भरून व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येईल. एक आठवड्याच्या आत एकरकमी एफआरपी पंधरा टक्के व्याजासह अदा करावी, असे निवेदन शेतकरी नेते सतीश काकडे यांनी सोमेश्वर कारखान्यास दिले आहे.
04414
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.