पाटबंधारे खात्याच्या हापीसात नेऊन गुरं बांधू का?

पाटबंधारे खात्याच्या हापीसात नेऊन गुरं बांधू का?

Published on

सोमेश्वरनगर, ता. १५ : ‘‘चार-पाच दिवस झाले लाईटची डीपी सोडवून ठेवलीय. विहिरीत पाणी असूनसुध्दा पिकं तरकटायला लागल्यात. त्यात आमची रानची वस्ती. गाईंचा गोठा आहे. लाईटच नसली तर गुरांना पाणी कुठून आणायचं. रोज टँकरने पाणी आणतोय गुरांसाठी. आता पाटबंधारे खात्याच्या हापीसात नेऊन गुरं बांधू का?’’ असा सवाल भरत शेंडकर, बाबू शेंडकर यांनी केला आहे.
बारामतीच्या ग्रामीण भागातील नीरा डावा कालव्यालगत असणाऱ्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी थेट रोहित्रच बंद ठेवण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. मागील पंधरवड्यात सात दिवस रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बंद ठेवून पिकांवर संकट आणले होते. ते कसेबसे सहन केले. मात्र आता पुन्हा नव्याने आठवडाभर रोहित्र बंद ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यामुळे विहिरीत पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने आणि गुरांना पाणी पुरविता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

माळेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी वीजकंपनीला पत्र काढले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव व मळद या पाटबंधारे शाखा कार्यालयाच्या हद्दीतील कालव्याच्या दोन्ही बाजूचे शेतीपंप एकाच वेळी सुरू होतात आणि कालव्याची पाणीपातळी कमी होते असा शोध पाटबंधारे खात्याने लावला आहे. त्यासाठी तब्बल पंधरा दिवस रोहित्र बंद ठेवा असे आदेश वीजकंपनीला दिले आहेत. त्यानुसार वीजकंपनीनेही थेट रोहित्रच बंद करायचा धडाका लावला आहे. यामुळे ऐन तीव्र उन्हाशी सामना करत जपलेली पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वीजकंपनीचे उपविभागीय अधिकारी अरविंद अंबोरे म्हणाले, वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने रोहित्र बंद करत आहोत.

ऊस, कडवळ, मका, अन्य फळभाज्या व भाजीपाला पिके हातची जाणार आहेत. लाखो रुपये खर्च करून शेती करत आहोत हे पाटबंधारे व वीजकंपनीला कळत नाही का. आधीच आठ तास वीजपुरवठा होतो त्यातही तारा तुटणे, शॉर्टसर्किट, फ्यूज उडणे यामुळे विहिरीत पाणी असून, पिकांना पाणी देता येत नाही. त्यात आता पंधरा दिवस वीज बंद ठेवली तर पिके पेटवून द्यायची का?
- कैलास जगताप, शेतकरी


पंधरा दिवस रोहित्र बंद ठेवले जाणार नाहीत. बारामती ग्रामीणचे तीन विभाग केले असून, प्रत्येक विभागात सातच दिवसांसाठी वीजपंप बंद राहतील. कालव्याच्या अंतिम भागातील शेतकऱ्यांना पाणी पोचविण्यासाठी हे करत आहोत.
-शरद मोरे, पाटबंधारे खात्याचे अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com