आडसाली ऊस लागवड हंगाम संकटात

आडसाली ऊस लागवड हंगाम संकटात

Published on

सोमेश्वरनगर, ता. २७ : पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतांचे अक्षरशः तलाव झाले आहेत. यामुळे सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या तीनही कारखान्यांचा तब्बल साठ हजार एकर क्षेत्रावरील आडसाली ऊस लागवड हंगाम संकटात सापडला आहे. गेली साठ वर्ष १५ जून अथवा एक जुलै हाच लागवड प्रारंभ असतो. मात्र, तो मुहूर्त गाठणे शेतकऱ्यांना आणि कारखान्यांनाही शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.

नीरा नदीच्या पट्ट्यात शेतकऱ्यांसाठी आडसाली ऊस लागवड हंगाम (१५ जून/एक जुलै ते १५ ऑगस्ट) सर्वाधिक महत्वाचा असतो. सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती या तिन्ही कारखान्यांकडे एक ते सव्वा लाख एकर ऊसक्षेत्र आहे. त्यापैकी पन्नास ते साठ टक्के ऊस आडसाली असतो. कारण आडसाली लागवडी होऊन बेसल डोस टाकून शेतकरी मोकळा होताच मॉन्सून येतो आणि पोषक हवामान मिळते. चांगली उगवण, फुटवे होऊन एकरी उत्पादन पूर्वहंगामी व सुरू लागवडीपेक्षा खात्रीने अधिकचे मिळते. कारखान्यांनाही उत्कृष्ट साखर उताऱ्याचा, वजनाचा ऊस मिळतो. ऊसतोडीला लवकर क्रमांक यावा म्हणून शेतकरी आडसाली हंगामाच्या पहिल्या तारखेचा (एक जुलै) मुहूर्त गाठण्यासाठी जिवाचे रान करतात.

मात्र, या वर्षी मशागतींना सुरवात करण्याआधीच तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे चारशे मिलिमिटर पाऊस झाला. चाऱ्या, नाले, पाट तुडुंब वहात आहेत. यामुळे शेतातले पाणी आटायला पंधरा दिवस आणि वाफसा येण्यासाठी पुढचे पंधरा दिवस लागतील. त्यानंतर नांगरट करून सरी काढावी लागेल. अशात मॉन्सून आला तर लागवडी आणखी खोळंबणार आहेत.

अतिवृष्टीने एक जुलैच्या लागवडी खोळंबणार आहेत. या पार्श्वभूमीवर उसाच्या रोपलागवडीचा किंवा खरिपाचे पीक घेऊन पूर्वहंगामी ऊसलागवडीचे पर्यायही शेतकरी काढतील. चांगल्या पावसाने एकूण लागवडीत वाढ होईल.
- बापूराव गायकवाड, ‘सोमेश्वर’चे शेती अधिकारी

ऊस लागवड हंगाम १५ जुलै करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चर्चा झाली आहे. तिन्ही कारखान्यांचे एक धोरण ठेवण्याबाबत विचार करू. आगामी काळात साखरेचे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आपापल्या सोयीने चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिक ऊसलागवड करतील.
- पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष साखर संघ


ऊस लागवड वाढणार
सोमेश्वरचे कार्यक्षेत्र बारामतीचा पश्चिम भाग व पूर्ण पुरंदर तालुका आहे. चांगला पाऊस झाल्याने बारामती, पुरंदरच्या जिराईत भागात ऊसलागवड क्षेत्र खात्रीने वाढणार आहे. माळेगावचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. मात्र छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातही ऊसलागवड वाढणार आहे. दरम्यान, ऊसलागवडीचा मुहूर्त टळल्यानंतर खरीप हंगामाचे बाजरी, सोयाबीन, तूर असे एखादे पीक घेऊन त्यानंतर पूर्वहंगामी (सप्टेंबर/ऑक्टोबर) ऊसलागवड करण्याचा पर्यायही शेतकऱ्यांना मिळणार आहे.


कारखाना एकूण ऊसलागवड क्षेत्र (एकरामध्ये)
सोमेश्वर.................४० ते ४५ हजार
छत्रपती.................३५ ते ४० हजार
माळेगाव.................३० ते ३५ हजार


04588

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com