पाणीपुरवठा योजनांना मिळाली संजीवनी
सोमेश्वरनगर, ता. १ : दमदार पावसानंतर गेल्या आठवडाभरात ओढ्या, नाल्याला पाझर सुरू आहेत. करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थानजवळील पर्वती तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. दरम्यान, मुर्टी-मोढवे येथील पुरंदरे तलाव पूर्ण भरून पाणी वहात असल्याने वाकी येथील पाऊण टीएमसीचे छोटे धरणही वीस टक्के भरले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनांनाही जणू संजीवनी मिळाली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर ते मुर्टी परिसरात अडीचशे ते तीनशे मिलिमीटर पाऊस २८ मेपर्यंत कोसळला. संततधार पावसाने परिसरातील ओढे, नाले, चारी वाहू लागल्या होत्या. या पावसाने मुर्टी-मोढवे येथील पुरंदरे तलाव आणि चिमटीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून मोठ्या प्रमाणात ओढ्याद्वारे पाणी वाकी धरणाला जाऊन मिळत होते. पावसाआधी वाकी धरणातील पाणीसाठा पूर्ण संपला होता आणि वाकी परिसरातील पाणीपुरवठा विहिरी आटल्या होत्या. तसेच या पट्ट्यातील चाळीसेक विहिरींचे पाणी आटून शेती अडचणीत आली होती. मात्र जून उजाडण्यापूर्वीच पुरंदरे तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने धरण वीस टक्के भरले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच पण वाकी धरणावर अवलंबून असलेला कानाडवाडी, मोराळवाडी, चोपडज पट्ट्यातील शेतकरीही सुखावला आहे. बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनीही शनिवारी तलावाची पाहणी केली.
करंजे (ता. बारामती) येथील सोमेश्वर देवस्थानजवळील पार्वती तलाव चौधरवाडी, रासकरमळा परिसरात झालेल्या पावसात निम्मा भरला होता. मागील चार-पाच दिवस पाझर सुरू असल्याने तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे लांडगोबा ओढाही वाहू लागला असून या ओढ्यावरील बंधाराही पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे विहीरी भरून वाहू लागल्याचे, लक्ष्मण लकडे यांनी सांगितले.
ओढ्यांची डागडुजी करण्याची मागणी
सोरटेवाडी व करंजेपूलच्या मधोमध असणाऱ्या ओढ्याची झाडाझुडपांची आणि अतिक्रमणामुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे ओढ्यात पाणी न बसल्याने परिसरातील शेतात पाणी घुसून पिके आणि माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही ओढ्यांची डागडुजी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पाणीटंचाईमुळे पाटबंधारे, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार केले होते. अजितदादांमुळे जलजीवनचे पाणी मिळून टंचाईत मदत झाली. आता धरणातच पाणी आल्याने पाणीप्रश्न संपूर्णपणे संपला आहे. सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
- किसन बोडरे, सरपंच, वाकी
04603
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.