वृक्षप्रेमींकडून गाव हरित करण्यासाठी धडपड

वृक्षप्रेमींकडून गाव हरित करण्यासाठी धडपड

Published on

सोमेश्‍वरनगर, ता. ५ : मोबाईलपासून मुक्ती हे उद्दिष्ट ठेवून मुरूम (ता. बारामती) येथील सुमारे २० तरूणांनी दररोज सायंकाळी गावातील विद्यालयाच्या मैदानावर खेळायचा निर्णय घेतला. खेळता खेळता ‘ग्रीन फाउंडेशन’ स्थापन करून आधी शाळेभोवती वृक्षलागवड केली. मग वर्ष-दीड वर्षात गावातही वड, चिंच, पिंपळ, बकुळ अशा झाडांची चारशे रोपे लावली असून त्याची दैनंदिन निगाही राखली आहे. या चळवळीतून काहींनी आपापल्या शेतातही शेकडो झाडे लावली आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही झाडांची गोडी लावली आहे.
कोरोनानंतर मोबाईलपासून दुरावा मिळावा आणि व्यायामही व्हावा या उद्देशाने गावातील काही तरूणांनी, मध्यमवयीन गृहस्थांनी मल्लिकार्जुन क्रिकेट क्लब स्थापन केला आणि न्यू इंग्लिश स्कूलसमोरील मैदान तयार केले. अडीच वर्षे तरुण, मध्यमवयीन नागरिक आणि विद्यार्थी इथे क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. विद्यार्थ्यांची फुटबॉलची टीम स्पर्धांनाही जाऊ लागली आहे. खेळताना पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊत, विजय जगताप, अमोल जगताप, भरत शिंदे, मयूर राऊत, सुहास चव्हाण आदींनी विद्यालयाभोवती वृक्षालागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुमारे २० तरुण येऊन मिळाले. श्रमदानातून खड्डे काढले, माती आणली. एक ते दीड वर्ष वयाची वड, पिंपळ, चिंच, बकुळ, जांभूळ, गुलमोहर, उंबर अशी रोपे आणली आणि लागवड केली. रोपांना ठिबक सिंचन केले आणि संरक्षक जाळ्याही बसविल्या. विद्यालयाच्या सहयोगाने १०१ झाडांचे पालकत्व १०१ मुलांना दिले. यामुळे एखाददुसरे रोप वगळता सर्व झाडे दहा फुटापर्यंत वाढली आहेत. तांत्रिक मार्गदर्शन मंगेश कदम यांनी केले. या यशानंतर गावातील दोन अंगणवाड्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मल्लिकार्जुन मंदिर, स्मशानभूमी या सार्वजनिक ठिकाणीही आणखी तीनशे देशी रोपांची लागवड करून ठिबक सिंचन केले. अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेभोवतीच्या झाडांचे पालकत्व विद्यार्थ्यांनाच दिले आहे. सर्व झाडे आठ-दहा फूट उंच झाली आहेत. सगळा खर्च या तरूणांनी स्वत: केला आहे. याच प्रेरणेतून केतन शिंगटे, माउली शिंदे, रवी जगताप, विजय जगताप, प्रशांत राऊत यांनी आपापल्या शेतातही शेकडो झाडे लावली असून पुढच्या पिढ्यांसाठी सावलीची, स्वच्छ हवेची तरतूद करत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वाढले वृक्षप्रेम
ग्रीन फाउंडेशनने लावलेल्या झाडांचे पालकत्व शालेय विद्यार्थ्यांना दिले असून मुलांनी झाडांना आळी केली आहेत. ओलावा टिकावा म्हणून पाचट अंथरले आहे. मुले रोज पाणी घालतात. कुणाचे झाड मोठे होते याची स्पर्धा लागली आहे. यामुळे फाउंडेशनने मुलांना त्यांच्या घरी लावण्यासाठी झाडांची रोपे दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com