अश्वरिंगण सोहळ्याला जणू पांडुरंग अवतरला
सोमेश्वरनगर, ता. २६ :
दिंड्या पताका मृदंग। टाळ घोळ नामे सुरंग ।।
तेथे आपण पांडुरंग। भक्तसंगे नाचत ।।
या संत सोपानकाकांच्या उक्तीप्रमाणे सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी (ता. २६) दिंड्या- पताका फडकवत आणि टाळ- मृदुंगाचा गजर करत सोपानकाकांच्या पालखीचा पहिला अश्वरिंगण सोहळा पार पडला. याप्रसंगी ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या गजरात नाचणाऱ्या भक्तांमध्ये जणू पांडुरंग अवतरला होता.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा निंबूत (ता. बारामती) येथील उत्तरपूजा उरकून पहाटेच मार्गस्थ झाला. सकाळच्या प्रहरी निंबूत छपरी येथे अल्पोपाहारासाठी सोहळा विसावला. सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे, सदस्य नंदू काकडे, शिवाजी लकडे, शिवाजी दगडे आदींनी स्वागत केले. याप्रसंगी ग्रामस्थांनी चहा, नाश्ता, फळे वारकऱ्यांना भेट दिली. यानंतर भोजन आणि विश्रांती यासाठी पालखी सोहळा वाघळवाडीतील अंबामाता मंदिरात विसावला. फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत आणि रांगोळी अंथरूण पालखीचे स्वागत सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे यांनी केले. याप्रसंगी सतीश सकुंडे, अजिंक्य सावंत, विजय सावंत, संजयकुमार भोसले, जितेंद्र सकुंडे, अविनाश सावंत, बबलू सकुंडे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीने शिरा, भात, आमटी, तर हरणाई माता मंडळाने पिठलं-भाकरीचा गावरान बेत आयोजित केला होता. साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडीसीटी मेडीकल अँड पॉलिक्निलक यांच्या वतीने मोफत औषधोपचार केले.
दुपारी काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर ढगाळ वातावरणात पालखीप्रमुख त्रिगुणमहाराज गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अश्वरिंगण सोहळा रंगला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, मिलिंद कांबळे, देविदास वायदंडे, शैलेश रासकर, मदन काकडे, लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले, ऋषी गायकवाड, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.
असा रंगला सोहळा
वारकरी, टाळकरी, दिंडेकरी, वीणेकरी यांनी गोल मानवी रिंगण तयार केले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर टिपेला पोचला होता. टाळ- मृदुंगाच्या एकाच तालात पायाचा ठेका देत भक्तिभावाने वारकरी रिंगणी नाचत होते. पालखीच्या तीन प्रदक्षिणा झाल्या. यानंतर मानाच्या अश्वाने भरधाव वेगाने मधोमध ठेवलेल्या पालखीला तीन प्रदक्षिणा घालत अभिवादन केले. दुसऱ्या अश्वानेही रिंगण पूर्ण केले. टाळकरी, विणेकरी, तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला यांनीही वय विसरून बेभानपणे धावत सोपानकाकांना अभिवादन केले. वडगाव निंबाळकर पोलिसांनीही रिंगणात धावण्याचा आनंद लुटला. रिंगणसमाप्तीनंतर फुगडीचे खेळ रंगले होते. सायंकाळी पालखी सोहळा सोमेश्वर कारखान्यावर विसावला. कारखान्यावर महाआरती झाली. परिसरातील भाविकांनी रांगा लावून पादुकांचे दर्शन घेतले. पालखी शुक्रवारी (ता. २७) कोऱ्हाळे बुद्रुक येथे मुक्कामी राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.