जेजुरी, मोरगावची ऊस लागवडीत आघाडी
सोमेश्वरनगर, ता. ८ : पावसाळा दमदार असल्याने सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. परवानगीच्या पहिल्याच दिवशी (१ जुलै) तब्बल ७ हजार १११ एकर ऊसलागवड झाली आहे. ती गतहंगामापेक्षा ७८२ एकर जास्त आहे. जेजुरी, मोरगाव अशा गटातील जिराईत गावांनी लागवडीत आघाडी घेतली आहे. चालू लागवड हंगामात विक्रमी ऊस लागवडीची शक्यता आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे बारामतीतील मोरगाव-सुपे ते अंजनगावपर्यंतचा जिराईत भाग आणि पुरंदरमधील जवळार्जुनपासून सासवडपर्यंतचा जिराईत भाग जेव्हा ऊस लागवडीकडे वळतो. तेव्हा ऊसगाळपासाठी कारखान्याला घाम गाळावा लागतो. त्यामुळे कारखान्याने विस्तारीकरण केले तरीही सध्या कारखाना नऊ हजार टन प्रतिदिन क्षमतेने चालतो. पाच महिन्यात साडेचौदा लाख टन ऊस गाळप होऊ शकतो. आतापर्यंत २०२२-२३ हंगामात ३७ हजार एकर विक्रमी ऊस गाळप करून १५ लाख २३ हजार टनांचे उच्चांकी गाळप झाले होते. आता आडसाली लागवड पाहता एकूण लागवड क्षेत्र चाळीस हजार एकरांच्या पुढे जाऊन सगळे विक्रम मोडले जातील असा ट्रेंड दिसत आहे. कारण पुरंदरमधील गराडे, नाझरे, पिलाणवाडी, माहूर तर बारामतीच्या जिराईत भागातील वाकी, मुर्टी, मुढाळे येथील मोठ्या तलावांसह सर्वत्र ओढ्यांवरील बंधारे ओसांडून वहात आहेत.
दृष्टिक्षेपात
१. गतवर्षी एक जुलैला ६ हजार ३२९ एकरवर झाली होती ऊसलागवड
२. बागायत भागात पावसामुळे लागवडीत घट
३. जिराईत भागात लागवड वाढली
४. गतवर्षीपेक्षा ७८२ एकरांची वाढ
५. कारखान्याच्या होळ, कोऱ्हाळे, खंडाळा या बागाईत गटांमध्ये घट
६. मोरगाव, जेजुरी या जिराईत भागात जोरदार लागवडी सुरू
७. करंजे गटातही चौधरवाडी, वाकी तर पिंपरे गटातही राख, गुळुंचे भागात लागवडीत वाढ
चांगला पाऊस आणि खात्रीचे पैसे मिळवून देणारे पीक या कारणांनी जिराईत भागात यावर्षी खूप ऊस लागवड होत आहे. पूर्ण लागवड हंगामात केवळ जिराईत भागात पंधरा हजार एकर लागवड होईल. उच्चांकी गाळपाची संधी साधण्यासाठी कारखान्याने हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीकडे वळावे आणि सरकारने १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करावेत.
- दिलीप खैरे, सुपे, सभासद
ऊस तोडणीसाठी लकी ड्रॉ
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याने १ जुलैला ऊसलागवडीच्या घेतलेल्या नोंदीची तपासणी करून ६५७ एकराच्या नोंदी बाद केल्या आहेत तर ७१११ एकर नोंदी अंतिम केल्या आहेत. या उसाच्या तोडणीसाठी नुकतीच गटनिहाय लकी ड्रॉ पद्धतीने सभासदांची क्रमवारी पारदर्शकपणे निश्चित केली आहे.
ऊस लागवडीची तुलनात्मक आकडेवारी (एकरांत)
गट..........१ जुलै २०२४..........१ जुलै २०२५
निंबूत..........४४५..........६५७
मुरूम..........४६१..........५३०
होळ..........१०४३..........९७७
कोऱ्हाळे..........१०२९..........७९४
मोरगाव..........५३३..........८३२
जेऊर..........५६२..........६४४
जेजुरी..........३०४..........४५७
खंडाळा.......... ५६२..........४८५
पिंपरे..........५९८..........७४८
करंजे..........७८९..........९८३
04695
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.