अंतरानुसार शेतकऱ्यांना दर देणेही शक्य

अंतरानुसार शेतकऱ्यांना दर देणेही शक्य

Published on

सोमेश्वरनगर, ता. १७ : सध्या उद्योगापासून शेतीपर्यंत सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाचा दररोज साखर उतारा तपासणे साखर कारखान्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परिपत्रकाचाही आदर होईल आणि शेतकऱ्यांनाही ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात एकरकमी एफआरपी मिळू शकेल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या गोष्टींचे समर्थन तर केलेच आहे शिवाय अंतरानुसार शेतकऱ्यांना दर देणेही शक्य होईल, असा प्रस्तावही मांडला आहे.

सरकारच्या ऊस नियंत्रण कायदा १९६० अन्वये ऊस तुटल्यापासून चौदा दिवसात एफआरपी (रास्त व उचित दर) देणे बंधनकारक आहे. त्यासाठी गतवर्षाचा उतारा विचारात घेऊन हिशेब करावा व तोडणी वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्याला एकरकमी ऊसबिल अदा करावे अशी परंपरा आहे. मात्र, साखरसंघाच्या विनंतीवर स्पष्टीकरण देताना गतवर्षाचा नव्हे तर चालू वर्षाचाच उतारा हिशेबात घ्यावा असे केंद्रसरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपीच्या अधिकारापासून शेतकरी वंचित राहणार आहेत. पायाभूत उताऱ्यानुसार (१०.२५ टक्के) एफआरपीचा पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर साखर उतारा अंतिम केल्यावर उर्वरित हप्ता असे तुकडे होणार हे निश्चित आहे. ही बाब कारखान्यांच्या पथ्यावर पडणारी असून शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा येणार आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा, एआयचा वापर केला तर केंद्रसरकारचा आणि साखरसंघाचाही संबंधित वर्षाचा उतारा धरावा हा हट्ट पूर्ण होणार आहे आणि शेतकऱ्यांनाही चौदा दिवसात एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, माझ्याकडे खासगी कंपनीचे लोक प्रेझेंटेशनसाठी आले होते. त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने अमुक एकरात किती टन ऊस निघेल आणि त्याचा साखर उतारा काय असेल हे अचूक सांगितले आणि कारखान्यावर तपासले असता आकडे तंतोतंत आले. राज्यसरकार ''एआय''ला प्रोत्साहन देत आहे मग त्यांनी हे तंत्रज्ञान उपलब्ध करावे. रोजच्या रोज साखर उतारा तपासावा आणि त्यानुसार एकरकमी एफआरपी अदा करावी. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या उसाच्या दर्जानुसार दर मिळेल. शिवाय चांगल्या दर्जासाठी शेतकऱ्यांची स्पर्धा लागेल. कारखान्यांची काटामारीसुध्दा थांबेल.

अंतरानुसार तोडणी वाहतूक खर्च
साखर उताऱ्यावर आधारित एफआरपी देताना सद्यःस्थितीत सरासरी नऊशे ते हजार रुपये प्रतिटन तोडणी वाहतूक खर्च वजा केला जातो. ज्या शेतकऱ्याचा ऊस एक किलोमीटरवर आहे त्यालाही तोच दर आणि ज्याचा शंभर किलोमीटरवरून आला आहे त्यालाही तोच दर असतो. ज्याचा उतारा बारा आहे त्यालाही तोच आणि दहा आहे त्यालाही तोच दर देतात. अंतरानुसारच प्रत्येक शेतकऱ्याचा होतोय तेवढाच तोडणी वाहतूक खर्च वजा करावा, एआय तंत्रज्ञानाने उताराही काढावा. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घामाचेच दाम मिळू शकेल, असे मतही ऊस उत्पादक पोपटराव बेलपत्रे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com