बारामतीत आज कॅन्सर तपासणी शिबिराचे
माळेगाव, ता. २६ : ग्रामविकास मंच, पणदरे व बारामती तालुका दूध उत्पादक संघ यांच्या वतीने ‘कॅन्सर मुक्त तालुका’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बारामतीच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना बारामती दूध संघाच्या कार्यालयात रविवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजता कॅन्सर तपासणी शिबिराचे मोफत आयोजन केले आहे.
कॅन्सरमुक्त तालुका अभियानांतर्गत मोफत कॅन्सर तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बारामती दूध संघाच्या कारभारी चौकातील कार्यालयात कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात मुंबईच्या टाटा रूग्णालयातील कॅन्सर सर्जन व अहिल्यानगरच्या रूरल कॅन्सर अँड रिलिफ सोसायटीचे डॉ. प्रकाश गरुड व एम्स रूग्णालयातील कॅन्सर सर्जन डॉ. योगेश गरुड हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंचाचे अध्यक्ष मोहन ढोरे व दूध संघाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी दिली.
यांनी करावी तपासणी
शरीरात कोठेही न दुखणारी गाठ असणे, स्त्रियांच्या स्तनांमध्ये गाठी असणे, लघवी व संडासमधून रक्त पडणे, स्त्रियांच्या अंगावरून सतत पांढरे जाणे, थुंकीवाटे रक्त येणे, तोंडातील व्रण बरा न होणे, अन्न गिळताना छातीत अडकणे किंवा उलट्या होणे, आवाजात बदल होणे, संडासच्या सवयी आकस्मिक बदलणे, स्त्रियांमध्ये पाळी नसतानाही अनियमित आणि वरचेवर योनीतून रक्तस्राव होणे, तीळ व चामखीळ यांचा आकार वाढणे, तोंडातील वाढत जाणारी आणि दुखणारी गाठ किंवा वाढणारे चट्टे, भूक मंदावणे व वजन घटणे.