साखरेच्या दराला प्रतिक्विंटल चार हजारपर्यंतची गोडी
संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ३१ : साखरेच्या दरात सणासुदींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ३१) १०० ते १२० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झाली आणि साखरउद्योगाच्या इतिहासात प्रथमच साखरेने प्रतिक्विंटल चार हजार रूपयांच्या आकड्याला स्पर्श केला. गेले काही वर्षे अडचणीत आलेल्या साखरउद्योगासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान, साखरेचे दर पाहता इथेनॉलची दहा टक्के दरवाढ करणे आता क्रमप्राप्त झाले आहे अन्यथा कारखान्यांचा इथेनॉलनिर्मितीचा उत्साह घटण्याची दाट शक्यता आहे.
साखरेचे दर गेली पंधरा वर्षे अधूनमधून जास्तीत जास्त ३७०० ते ३८०० रुपयांपर्यंत पोहचत होते. तर, दहा वर्षे ३०००च्या पुढे दर आहेत, मात्र सरकारी धोरणांमुळे ते ४०००पर्यंत जाऊ शकले नव्हते. अखेर साखरनिर्मितीत अठरा टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाल्याने आणि सणांसाठी मागणी वाढल्याने गुरुवारी उच्च दर्जाची साखर चार हजारांवर पोचली. सरकारी वक्रदृष्टी न झाल्यास दरवाढ दिवाळीपर्यंत तरी टिकेल, अशी शक्यता आहे.
मागील आठवड्यापर्यंत लहान साखरेला (एस १) ३८०० रूपये, तर मोठ्या साखरेला (एम ३०) ३८८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर होता. सोमवारी केंद्र सरकारने मे महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टनांचा साखर कोटा जाहीर केला, तर राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने साखरेची तूट जाहीर केली.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोमेश्वर कारखान्याच्या एस १ साखरेला ३९३० रूपये, तर एम ३० साखरेला ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जिल्ह्यातील उच्च दर्जाची साखर निर्माण करणाऱ्या कारखान्याला ३९७० ते ४०६० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळाला.
दरम्यान, केंद्र सरकारने उसाच्या ज्यूसपासून व बी हेवी इथेनॉलच्या दरात गेली तीन वर्षे वाढ केलेली नाही. दुसरीकडे धान्यापासून इथेनॉलचा दर मात्र ७२ रुपये लिटरवर नेला आहे. आता साखरेचे दर ३८०० ते ४००० रूपयांच्या दरम्यान असतील, तर सरकारी दरात इथेनॉलनिर्मिती अजिबात परवडणारी नाही.
साखरेच्या दराने दिलासा दिला आहे. आता इथेनॉलच्या दरातही वाढ केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य होईल. सध्याच्या दरात इथेनॉलनिर्मिती आर्थिकदृष्ट्या तोट्याची आहे. सर्व प्रकारच्या इथेनॉलच्या किंमती दहा टक्क्यांनी वाढवून ७२ रुपये प्रतिलिटर करायला हव्यात.
- संदीप तौर, अध्यक्ष, व्यंकटेशकृपा कारखाना
साखरेचे दर सन २०१०मध्ये ३८०० रुपयांपर्यंत गेले होते. चार हजारांवर दर जायला पंधरा वर्षे वाट पहावी लागली. १ ऑक्टोबरला ४८ लाख टनांचाच शिल्लक साखरसाठा असेल, हे स्पष्ट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. आगामी हंगामात साखरउत्पादन वाढणार असल्याने पन्नास लाख टन निर्यात, पन्नास लाख टनांचे इथेनॉल, हे निर्णय घेतले तरच दर टिकतील.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना
इथेनॉलचे प्रतिलिटर दर (रुपयांत)
इथेनॉलचा प्रकार सन २०२२-२३ सन २०२३-२४ सन २०२४-२५
ज्यूस ६५.६१ जैसे थे जैसे थे
बी हेवी ६०.७३ जैसे थे जैसे थे
सी हेवी ४९.४१ ५६.२८ ५७.९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.