आठवी शिष्यवृत्तीत शिरूर, खेड, आंबेगावची बाजी

आठवी शिष्यवृत्तीत शिरूर, खेड, आंबेगावची बाजी

Published on

सोमेश्‍वरनगर, ता. ३ : पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालातही शिरूर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांचाच बोलबाला राहिला. या तीन तालुक्यातच तब्बल ६२ टक्के (५१५) विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. या तिन्ही तालुक्यात प्राथमिक शाळांनी पाचवीच्या परिक्षेत मिळविलेले यश विद्यालयांनी पुढे आठवीच्या निकालातही टिकवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इंदापूर, बारामती, जुन्नर या तालुक्यांची गुणवत्ता बरी आहे, तर दौंड व भोरची स्थिती मात्र चिंताजनक असल्याचे चित्र आहे.
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक हजार ४२ शाळांचे २० हजार ७०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५५६ विद्यार्थी गैरहजर होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांपैकी ८२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तसेच चार हजार ७५९ म्हणजेच २३.६२ टक्के विद्यार्थी पात्र (उत्तीर्ण) ठरले असून, १५ हजार ३८८ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या बहुतांश शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. आठवीची जबाबदारी शिरूर, खेड, आंबेगावच्या विद्यालयांनी चांगल्या प्रकारे पेलली. अन्य तालुक्यांत मात्र मोजक्याच शाळांनी या शिष्यवृत्ती परिक्षेकडे गंभीरपणे पाहिल्याचे स्पष्ट होत आहे.
शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येबाबत अन्य कोणताही तालुका शिरूरच्या जवळपासही आलेला नाही. आंबेगावने शाळांची संख्या कमी असतानाही खेड तालुक्याइतकेच लक्षणीय यश मिळविले आहे. जुन्नरला शिष्यवृत्तीधारकांची संख्या तुलनेने बरी आहे. तसेच इंदापूरमध्ये एकट्या गुरुकुल विद्यालयाचे ६६ शिष्यवृत्तीधारक वजा केले तर अन्य शाळांमध्ये ‘उजेड’ दिसून येईल. बारामतीतही एमईएस विद्यालयाचे शिष्यवृत्तीधारक वगळता सर्वत्र ‘आनंदीआनंद’ आहे.

दौंडचा निकाल नीचांकी
उत्तीर्ण (पात्र) विद्यार्थ्यांच्या संख्येत जिल्ह्याचा निकाल २३ टक्क्यांवरच अडकला आहे. यातही शिरूरचा निकाल सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्या पाठोपाठ आंबेगाव आहे. खेड तालुक्याला यात अजून काम करावे लागणार आहे, तर इंदापूर, बारामती, जुन्नर २५ टक्क्यांवर अडकले आहेत. या निकालात दौंड आणि भोर तालुक्याची गुणवत्ता नीचांकी आहे, तर हवेली आणि पुरंदर तालुके दुर्गम अशा मुळशी, राजगडच्या पंक्तीत जाऊन बसले असून सर्वांना भविष्यात उत्तीर्णांची संख्या वाढवावी लागणार आहे.

परिक्षेची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका : शाळा : परीक्षार्थी : पात्र : अपात्र : निकाल : शिष्यवृत्तीधारक
शिरूर : ९७ : २५०७ : १०१८ : १४४६ : ४१.३१ : २८६
खेड : १०९ : २०२२ : ५८१ : १३८८ : २९.५० : ११६
आंबेगाव : ५९ : ११३३ : ४१४ : ७०४ : ३७.०३ : ११३
इंदापूर : ९६ : १७१३ : ४३२ : १२५१ : २५.६६ : ८५
जुन्नर : ९६ : १५०८ : ३६८ : ११२४ : २४.६६ : ७६
बारामती : ९३ : २०२९ : ४९० : १४९७ : २४.६६ : ४१
मावळ : ८८ : १६६६ : ३१२ : १३०८ : १९.२५ : २५
दौंड : ९० : १७८७ : १७१ : १५७६ : ९.७८ : २१
हवेली : १२० : २५८५ : ४२१ : २०२७ : १७.१९ : १८
पुरंदर : ६९ : १०९६ : १९७ : ८८६ : १८.१९ : १६
मुळशी : ६० : १६०२ : २२३ : १२६७ : १४.९६ : १५
भोर : ५३ : ८४७ : ९१ : ७४१ : १०.९३ : ८
राजगड : १२ : २११ : ३८ : १७३ : १८.०० : ७

Marathi News Esakal
www.esakal.com