शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण मुलांचाच डंका
सोमेश्वरनगर, ता. ६ : पालकांचा त्यांच्या पाल्यांसाठी गुणवत्तेच्या आशेने इंग्रजी माध्यमांकडे ओढा वाढला आहे. असे असले तरी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने खरी गुणवत्ता सरकारी शाळांमध्येच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीत जिल्ह्यातील मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमाचे १०५३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत तर इंग्रजी माध्यमाच्या अवघ्या १५० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या मुलांचे निर्विवादपणे वर्चस्व दिसून येत आहे.
आठवी शिष्यवृत्तीत मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमाचे ९०० तर इंग्रजी माध्यमाचे २१० विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागातील २८४९ शाळांची ६१ हजार मुले पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस बसली होती. त्यापैकी १७७८८ विद्यार्थी पात्र (उत्तीर्ण) ठरले तर १२०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. त्यापैकी मराठी व सेमी माध्यमाचे ८८ टक्के (१०५३) तर इंग्रजी माध्यमाची १२ टक्के (१५०) विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस १८५६ शाळांमधील ३९ हजार १४८ मुले बसली होती. त्यापैकी ८९५४ विद्यार्थी पात्र ठरले तर १११० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. त्यापैकी इंग्रजी व सेमी माध्यमाची ८१ टक्के तर इंग्रजी माध्यमाची १९ टक्के विद्याथी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. शिवाय राष्ट्रीय गुणवत्ता यादीतही पहिल्या दहात मराठी माध्यमाच्याच मुलांचे वर्चस्व दिसून येत आहे.
इंग्रजी माध्यमातील मुलांना पाचवीपर्यंत इंग्रजीवर प्रभुत्व येत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे प्रश्न समजून घेणे, विचार करणे आणि अल्पावधीत उत्तरे लिहिणे या प्रक्रियेत कदाचित अडचण येत असावी. तसेच मातृभाषेतून संकल्पना लवकर स्पष्ट होतात त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांना यश दिसते. मात्र मुलांना किती स्पर्धा परीक्षांमध्ये अडकवडून ठेवायचे याचा विचार करावा लागणार आहे.
- डॉ. मंजिरी निमकर, शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक
गुरुजी पास सर नापास
पाचवीचे वर्ग जिथे जिल्हा परिषद शाळेला जोडले आहेत तिथेच बहुतांश विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. जिथे पाचवीचे वर्ग विद्यालयास जोडले आहेत. तिथे मात्र विद्यालये मागे पडली आहेत. सन्माननीय अपवाद वगळता विद्यालयांकडून शिष्यवृत्ती परीक्षेबाबत प्रचंड अनास्था दिसून येत आहे. याबाबत पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर म्हणाले, तासिका तत्वाप्रमाणे असलेली शिक्षणप्रक्रिया, शालाबाह्य कामांचा प्रतिकूल परिणाम, पॅटसारख्या अनावश्यक परीक्षांचा मारा, अभ्यासक्रम शिकवायचा की शिष्यवृत्ती यामुळे विद्यालयांना यश कमी दिसते. तुलनेने शिरूर, खेड भागात पालकांचा लोकसहभाग, प्रश्नपत्रिकांचा सराव, प्राथमिक शिक्षकांचे कष्ट यामुळे अधिक यश मिळताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.