सोसायटीतील अपहाराच्या नाना तऱ्हा

सोसायटीतील अपहाराच्या नाना तऱ्हा

Published on

सोमेश्वरनगर, ता. ११ : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद-विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत सचिवाकडून अपहाराच्या शक्य तेवढ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. कर्जबाकी असतानाही बोगस कर्ज उचलणे, शेतकऱ्यांनी रोखीने अथवा चेकने दिलेल्या रकमा बँकेत कर्जखाती न भरणे, नातेवाइकांच्या नावे बोगस कर्ज उचलणे, अशा अनेक गंभीर बाबी आहेत. सोसायटीचे ठराव नसताना किंवा ठराव बोगस असतानाही जिल्हा बँकेच्या नीरा शाखेकडून कर्जवाटप झाल्याची धक्कादायक बाबही लेखापरीक्षणात आहे.
कर्नलवाडी सोसायटीचे सुमारे दीड कोटींचे अपहार व गैरव्यवहार प्रकरण नुकतेच उजेडात आले असून, हे शेतकऱ्यांना, सोसायट्यांना, बँक अधिकाऱ्यांना ‘धडा’ देणारे ठरणार आहे. जितक्या प्रकारचा अपहार करता येऊ शकतो, ते सगळे प्रयोग सचिव मंगेश निगडे याच्याकडून झाले आहेत. सहाशेपैकी तब्बल १२८ शेतकऱ्यांबाबत हे घडले आहे.
सोसायटीच्या पूर्वपरंपरेनुसार शेतकऱ्यांनी रोखीने, धनादेशाने कर्जहप्ते दिले, मात्र सचिवाने बँकेत न भरता त्या वापरल्या. शेतकऱ्यांच्या नावे आधीचे कर्ज असतानाही नवे बोगस कर्ज उचलले. सन २०२३-२४ या एका वर्षात फेरकर्जवाटप विषयात ७७ सभासदांपैकी २७ जणांच्या नावे बोगस दुबार कर्ज उचलले, तर पीककर्ज वाटपात ५१ सभासदांपैकी ४२ जणांना बोगस ठरावाद्वारे, तर ९ जणांना ठराव नसताना कर्ज दिले गेले. सचिवाने अपहाराच्या सर्व रकमेची जबाबदारी स्वीकारली आहेच, शिवाय माजी सचिव, बँक अधिकारी व सर्व संचालक यांच्यावरही जबाबदारीत पार न पडल्याचा ठपका ठेवला आहे.
आता अपहाराच्या रकमा भरून आमची खाती मोकळी करावीत, अशी मागणी बाधित शेतकरी करत आहेत. तर संचालक मंडळ व बँक अधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला आहे.


अपहाराच्या नाना तऱ्हा
. आधीचे कर्ज असताना दुबार कर्जवाटप
. शेतकऱ्यांना कर्ज-नवे जुने करण्याचे आमिष दाखवून अपहार
. मयताच्या नावावरील कर्ज नील करण्यासाठी वारसाने दिलेल्या बँक चलनाचा दुरुपयोग
. शेतकऱ्यांच्या कर्जापोटी भरलेल्या रोख रकमा, कोरे धनादेश बँकेत न भरणे
. कमी-जादा व्याज घेऊन संस्थेचे नुकसान करणे
. सभासदांच्या नावच्या अनामत रकमा वापरणे
. नातेवाईकाच्या नावे क.म. मंजुरी अथवा जमीन नसताना कर्ज उचलणे
. संस्थेच्या खत दुकानात, वीजबिलातही अपहार करणे
. एकच वसूल दोन खात्यात नोंद करणे
. कर्ज बाकी असताना ‘नील’चा दाखला देणे

बँक विकास अधिकाऱ्यांचे दोष
- क्षेत्र नसताना किंवा कमाल मर्यादा पत्रक मंजुरी नसताना कर्जवितरण
- आधीचे कर्ज भरल्याची शहानिशा न करता नवे कर्जवितरण
- संस्थेचा ठराव नसताना किंवा बोगस ठराव असताना शहानिशा न करता कर्जवाटप

एकूण गैरव्यवहार
तपशील अपहार (रुपये) आर्थिक नुकसान (रुपये)
पीककर्जातील अपहार ५९,०७,८६९ १८,७२,३७०
मध्यममुदत अपहार १९,८२,३३२ १५,४२,७३८
सभासद अनामत अपहार २,७३,५७९ ५४१६२
नील दाखला अपहार २,०२,८३७ ४३,२८८
नातेवाइकांच्या नावे १,४३,००० ८२,८७०
कमी-जादा वसूल ० १४,८६,६५६
बँक बचत अपहार २,५०,८७९ ७३,३७९
खतविभाग गैरव्यवहार ० ५,८२,८९८
दिशाभूल करून अपहार ६९,९०० ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com