बारामतीतून पत्नीचीच मोटार पळवली
सोमेश्वरनगर, ता. ८ : पतीकडून सुमारे ५० हजार रुपये येणे असल्याच्या कारणावरून चक्क त्याच्या पत्नीचीच मोटार पळवून नेण्याचा प्रकार बारामतीत घडला होता. याप्रकरणी गेवराई येथील एकावर चोरीचा गुन्हाही दाखल झाला. मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही बारामती तालुका पोलिसांना नाव-पत्ता माहिती असूनही चोर तर सापडला नाहीच पण मोटारही मिळाली नाही. बाधित महिला ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांची भावजय असून ती पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवत आहे.
बारामती शहराजवळ तांदूळवाडी येथील रशिदा आरिफ खान यांनी २ जुलै रोजी अमेझ होंडा ही मोटार चोरी झाल्याची तक्रार दिली. ६ जुलै रोजी अजित शिवाजी मैंद (रा. पोळाचीवाडी ता. गेवराई जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला. तक्रारीनुसार, रशिदा यांचे पती आरिफ खान वाहन खरेदी-विक्री करतात. एका व्यवहारात त्यांच्याकडून आरोपीला ४९ हजार ५०० देय होते. आरिफ यांच्याशी व्यवहाराच्या रागातून मैंद याने त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली मोटार तांदूळवाडी मशिदीसमोर उभी असताना चोरून नेली. याबाबत रशिदा खान म्हणाल्या, मी व माझे नातेवाईक दोन महिने पोलिसांकडे चकरा मारत आहोत. पतीच्या किरकोळ व्यवहारासाठी पत्नीच्या नावे असलेली मोटार चोरणे चुकीचेच आहे. मोटार मिळेल असे नुसतेच पोलिसांकडून सांगितले जात आहे.
याप्रकरणी राजन खान यांनी संपर्क केला होता. रविवारी (ता. ७) आमचे पोलिस पाठवले होते; परंतु संबंधित आरोपी घरी आढळून आला नाही. तिथल्या स्थानिक पोलिस ठाण्यालाही संपर्क केला असून आरोपी आढळताच पुन्हा पोलिस पाठवणार आहोत.
- वैशाली पाटील, पोलिस निरीक्षक
ज्येष्ठ साहित्यिकाला फटका
ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी एकत्र कुटुंबात असल्याने ही मोटार भावजय रशिदा खान यांच्या नावे खरेदी केली होती. मोटार चोरी झाल्यापासून राजन खान यांचे महाराष्ट्रभरातील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा यानिमित्ताने होणारे दौरे अडचणीत आले आहेत. प्रकृतीच्या तक्रारी असतानाही प्रसंगी एसटीने प्रवास करावा लागत आहे. शिवाय कुटुंबातील एका गंभीर आजारी रुग्णासाठीही मोटारीची आवश्यकता आहे. मात्र, पोलिसांना घाम फुटत नसल्याचे चित्र आहे.