इथेनॉलनिर्मितीवर दिवाळीच ‘संक्रांत’

इथेनॉलनिर्मितीवर दिवाळीच ‘संक्रांत’

Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. १९ : एकीकडे केंद्र सरकार पर्यावरणपूरक इथेनॉलचे उत्पादन वाढवा, असा धोशा लावते. मात्र, दुसरीकडे निर्णयात धरसोड करत असल्याने साखर उद्योगात अस्वस्थता आहे. डिस्टिलरी उद्योगांनी तेल विपणन कंपन्यांना तब्बल १७७६ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी केवळ १०४८ कोटी लिटर कोटा मंजूर केला आहे. त्यातही रसापासून आणि बी हेवीपासून इथेनॉलनिर्मितीवर तर संक्रांत आणली आहे. त्यामुळे भविष्यात आपले ‘दिवाळे’ वाजू नये अशी चिंता ऐन दिवाळीत साखर कारखानदारांना सतावू लागली आहे.

केंद्र सरकार इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देत असतानाच २०२३-२४ अचानक इथेनॉलनिर्मितीवर बंधने लादत आपल्याच धोरणावर पहिला घाव घातला. काही महिन्यांपूर्वी इथेनॉलची अमेरिकेतून आयात होणार या चर्चेने कारखानदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. शिवाय साखर उद्योगातील इथेनॉलच्या गेली तीन वर्षे किंमतीही वाढविलेल्या नाहीत. अशात आता नव्या हंगामातही सरकारची इथेनॉल धोरणे साखरउद्योगाला कळेनाशी झाली आहेत.
देशभरातील साखर उद्योगाने ४७२ तर धान्यापासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांनी १३०४ कोटी लिटरच्या निविदा पुरविल्या होत्या. तेल कंपन्यांनी शुक्रवारी साखरउद्योगाला २८८ तर धान्य प्रकल्पांना ७६० कोटी लिटरचा कोटा मंजूर केला आहे. यात सी हेवी मोलासेसपासूनच्या (तिसऱ्या टप्प्यातील मळीपासून) इथेनॉलचा ९१ टक्के कोटा समाधानकारक आहे. मात्र बी हेवीचा (दुसऱ्या टप्प्यातील मळी) ७० टक्केच आहे. खरा घाव घातला आहे तो ज्यूसपासून इथेनॉल करणाऱ्या प्रकल्पांवर. त्यांचे केवळ ५५ टक्के इथेनॉलच उचलले जाणार आहे. यामुळे आधीच व्यवस्थापन खर्चात प्रचंड वाढ होतेय आणि साखरेचे भाव वाढत नाहीत याने संकटात आलेल्या कारखान्यांवर हा मोठा प्रहार ठरणार आहे. याचा फटका थेट कारखान्यांना बसणार आहे.


आम्हाला साडेचार कोटी लिटरचा प्रस्ताव दिला होता. प्रत्यक्षात कोटा १ कोटी ९३ लाखांचा मिळाला आहे. केवळ चाळीस टक्के कोटा मिळाला आहे. यामुळे डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण अडचणीत जाईल. गुंतवणूका केल्या आहेत, यंत्रणा भरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये लक्ष घालून पुरेसा कोटा मिळवून द्यावा, अशी मागणी केली.
- वीरधवल जगदाळे, संचालक, दौंड शुगर

साखरेचा भाव ४२०० रुपये प्रतिक्विंटल हवा
एक कारखान्याचे व्यवस्थापक म्हणाले, प्रचंड कर्जे काढून गुंतवणुका केल्या आहेत. ज्यूस टू इथेनॉलला जाण्यासाठी बॉयलिंग हाऊस केलेले नाहीत. त्यामुळे ज्यूसचा साठा करू शकत नाही. ज्यूस टू इथेनॉलमुळे गाळपक्षमता वाढत असल्याने ऊसतोड मजूर जास्त भरले आहेत. अशात साखरेचे भाव तरी ४२०० रुपये प्रतिक्विंटल हवेत.


सर्व आकडे कोटी लिटरमध्ये
इथेनॉल प्रकार प्रस्तावित कोटा मंजूर कोटा
ज्यूस - ११६ ६२
बी हेवी - ८१ ५१
सी हेवी - ४ ३
धान्य - ६५ २९
एकूण २६६ १४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com