‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ची लढत रंगणार?
‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ची लढत रंगणार?
बारामती पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत झाल्याने पदाच्या आशेने दिग्गजही पंचायत समितीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण आरक्षण पडलेल्या चार गणांत चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या लढतीला ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’चे स्वरूप येणार का, याची उत्सुकता आहे. तालुक्यात आपापल्या गणांपुरती ताकद बाळगून असलेले भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची ताकद कुणाच्या पारड्यात पडणार यावरही चुरस अवलंबून राहणार आहे.
- संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर
बारामती पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच दबदबा राहिला आहे. सन २०१३मध्ये विरोधकांच्या आघाडीने निंबूत, करंजेपूल, सुपे, शिर्सुफळ या चार गणांमध्ये विजय मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. मात्र, सन २०१७मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व बारा जागा राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडल्या होत्या आणि विरोधात असलेल्या भाजप-शिवसेना व अपक्षांचा मोठा पराभव झाला होता. आताच्या निवडणुकादेखील स्वबळावर लढल्या गेल्यास सुपे, शिर्सुफळ, निंबूतसह काही गणांतील निवडणुका चुरशीच्या होऊ शकतात. तसेच, गण रचना करताना करंजे, लोणी भापकर, सांगवी, मुढाळे या जुन्या ग्रुप ग्रामपंचायतींची यावेळी प्रचंड मोडतोड करण्यात आली आहे, ती नेमकी कुणाच्या पथ्यावर पडते आणि कुणाला मारक ठरते, हेही पहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागाने लोकसभेला शरद पवार यांच्या पक्षाला, तर विधानसभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उचलून धरले होते. आता पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये मतदारराजा काय करतो, याचे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व कारखान्याच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे वेळोवेळी जाहीर केले होते. त्यानुसार माळेगाव कारखान्यात विरोधात लढण्याचा अयशस्वी प्रयोगही केला होता. आता पंचायत समितीत तुतारी फुंकली, तर लढतींकडे पुन्हा राज्याचे लक्ष लागणार आहे. तालुक्यात भाजपची काही गणांमध्ये निश्चितपणे ताकद आहे. माळेगाव व सोमेश्वर कारखान्यावर शेतकरी कृती समितीचीही आपापली ताकद असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही ग्रामीण भागात सक्रिय कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांची मोळी बांधूनच सन २०१३ला विरोधकांना यश मिळाले होते.
पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. शिर्सुफळ, पणदरे, वडगाव, निंबूत हे मातब्बरांचे चार गण नेमके सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित झाले आहेत. सुपे, काऱ्हाटी, मुढाळे हे तीन गणदेखील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत. या सातही गणांमधून इच्छुकांची मोठी गर्दी असून, पक्षप्रमुखांना उमेदवार ठरविताना नाकी नऊ येणार आहेत. तर सर्वच पक्षांना गुनवडीमध्ये अनुसूचित जाती महिला आणि नीरावागज गटात अनुसूचित जातीचा उमेदवार शोधण्यासाठी शोधाशोधही करावी लागणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेला इतर मागासवर्गासाठी महिलेच्या रूपाने सुपे गटात एकमेवर जागा आहे. इतर मागास प्रवर्गातील अन्य इच्छुकांना आपले नशीब पंचायत समितीत आजमावावे लागणार आहे. डोर्लेवाडी, कांबळेश्वर येथे ओबीसी महिलांना, तर मोरगाव गणात ओबीसी पुरुषाला संधी आहे. गत निवडणुकीत शिर्सुफळची सर्वसाधारण जागा ओबीसीसाठी देण्यात आली होती. यावेळीही तसा प्रयोग होतो का, हे पहावे लागणार आहे.
तालुक्यातील प्रश्न
जिराईत भागातील सिंचनव्यवस्थेतील सुधारणा
शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता
जलजीवन योजनांची रखडलेली कामे
नीरा- मोरगाव रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था
करंजेपूल, वडगाव, पणदरे बाजारपेठांचे नियोजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

