‘एकरकमी एफआरपी’ जाहीर करणार का?

‘एकरकमी एफआरपी’ जाहीर करणार का?

Published on

सोमेश्वरनगर, ता. २९ : छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर या तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३१) उसाची मोळी टाकून होणार आहे. मंत्री समितीने नुकताच एकरकमी एफआरपीची जुनी पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे तिन्ही कारखान्यांची पहिली उचल म्हणून ‘एकरकमी एफआरपी’ जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मंत्री समितीने २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जुन्या पद्धतीने एफआरपी देण्याचे आदेश दिले. त्यामुळे मागील हंगामाच्या उताऱ्यानुसार एकरकमी एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी ‘छत्रपती’चा सकाळी नऊ वाजता, ‘माळेगाव’चा दुपारी दीड वाजता आणि ‘सोमेश्वर’चा दुपारी चार वाजता गाळप हंगाम प्रारंभ होणार आहे. तिन्ही कारखाने त्यांच्याच नेतृत्वाखाली चालले आहेत. गतहंगामात जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी २६०० रुपये प्रतिटन पहिली उचल दिली होती. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती कारखान्यांनी एकत्रितपणे २८०० रुपये उचलीचा निर्णय घेताच अन्य कारखान्यांनाही २८०० रुपयांवर दर न्यावे लागले होते. त्यामुळे शुक्रवारच्या सभेत पवार एफआरपीबद्दल काय बोलतात याची स्थानिक शेतकऱ्यांसोबत जिल्ह्यालाही उत्सुकता आहे. सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांना गेटकेन ऊस आणावा लागणार असल्याने पहिली उचल घसघशीत द्यावी लागणार आहे. विशेषतः सोमेश्वरला आपला ऊस बाहेर जाऊ नये आणि गेटकेनही आणता यावा यासाठी एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे.


‘सोमेश्वर’च्या फोडू शकतो ऊस दाराची कोंडी
सोमेश्वरचा आर्थिक ताळेबंद तिन्ही कारखान्यात सर्वात मजबूत आणि स्वच्छ आहे. तांत्रिक क्षमताही उत्कृष्ट आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी देऊन राज्याची ऊसदराची कोंडी ''सोमेश्वर'' फोडू शकतो. तसेच पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्टिलरीचे विस्तारीकरण, क्रीडांगणाचे काम प्रगती पथावर आहेच. तसेच पवार यांच्या सूचनेनुसार गाळेधारकांच्या संवेदनशील प्रश्नावरही संचालक मंडळाने सामोपचाराने मार्ग काढला आहे. त्यामुळे पवार यांच्या ‘सोमेश्वर’मधील वक्तव्याला अधिक महत्त्व असणार आहे.


निंबुतला शेतकरी मेळावा
शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या पुढाकाराने निंबूत (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शेतकरी मेळावा होणार आहे. तसेच सामाजिक व धार्मिक कामांचा प्रारंभ होणार आहे. या मेळाव्यात पवार हे शेतकऱ्यांशी कारखान्यांबद्दल आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल सूतोवाच करतील अशीही शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com