जिल्ह्यात पोलिस भरतीची मोठी संधी

जिल्ह्यात पोलिस भरतीची मोठी संधी

Published on

सोमेश्वरनगर, ता. २९ ः महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या भरतीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मागील भरतीप्रमाणेच उमेदवारांना एका पदासाठी पूर्ण पुणे जिल्ह्यात पोलिस दलाच्या व राज्य राखीव पोलिस (एसआरपीएफ) दलाच्या तब्बल २६७३ इतक्या जागा आहेत.
दरम्यान, १ जानेवारी २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत ज्यांनी विहित वयोमर्यादा ओलांडली आहे, अशांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यात दोन ते अडीच लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. राज्य पोलिस दलाने राज्यभरातील ४५ घटकांमध्ये १५ हजारपेक्षा अधिक जागांवर पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने काही घटकांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून, २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे. यामुळे अनेक वर्षे पोलिस होण्यासाठी मैदानावर आणि अभ्यासिकेत राबणाऱ्या तरुण- तरुणींना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे सन २०२२- २०२३ या वर्षांची पोलिस भरती रखडली होती आणि त्यामुळे अनेकांची वयोमर्यादा वाढून भरतीची संधी हुकली होती. वयोमर्यादा वाढविण्यासाठी मागील भरतीवेळी अनेकदा आंदोलने झाली. त्या वंचितांचा विचार आताच्या भरतीमध्ये केला आहे. पोलिस भरतीत खुल्या गटासाठी २८ आणि आरक्षित गटासाठी ३३ अशी वयोमर्यादा आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे शहर पोलिसमधील भरतीसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक १९६८ जागा उपलब्ध आहेत, तर पुणे ग्रामीण पोलिस दलात केवळ ६९ जागा आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांतही समाधानकारक जागा आहेत. या पोलिस भरतीसाठीदेखील आधी ५० गुणांची मैदानी आणि त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

मागील भरतीप्रमाणेच यावेळी सुद्धा एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करता येणार आहे. राज्यात पुणे जिल्हा व मुंबई मिळून तब्बल पाच हजार जागा उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे बँडसमन प्रमाणपत्र व वाहन परवाना असणाऱ्यांना मोठी संधी आहे. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना यावेळी न्याय दिला आहे.
- गणेश सावंत/ विक्रम बोंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

पुणे जिल्ह्यातील जागा
पुणे शहर - एकूण १९६८ (शिपाई - १७००, बँडसमन-३३, चालक- १०५, कारागृह- १३०)
पिंपरी चिंचवड - ३२२
पुणे ग्रामीण - ६९
पुणे लोहमार्ग - ५४
एसआरपीएफ, दौंड-क्र. ५ - १०४
एसआरपीएफ, दौंड क्र. ७ - १६५

आवश्यक कागदपत्रे -
दहावी व बारावीचे प्रमाणपत्र
जन्माचा दाखला
अधिवास प्रमाणपत्र
जातीचे व जातवैधता प्रमाणपत्र
एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र
आरक्षित प्रवर्गांसाठी नॉन क्रिमीलेअर
तसेच समांतर आरक्षणासाठी आनुषंगिक कागदपत्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com