वाणेवाडी येथील प्रथमेशला राष्ट्रीय विजेतेपद

वाणेवाडी येथील प्रथमेशला राष्ट्रीय विजेतेपद

Published on

सोमेश्वरनगर, ता. ३ : वाणेवाडी (ता. बारामती) येथील प्रथमेश बापूराव कोळपे या उदयोन्मुख कुस्तीपटूने हरियाना येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात राष्ट्रीय पदक मिळविणारा तो पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे. हलाखीच्या परिस्थितीत पैलवान मुलगा घडविणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे आणि प्रथमेशचे कौतुक होत आहे.
वाणेवाडी गावातील रामनगर या वस्तीवरील वाहनचालक व कोरोनाकाळातील समाजसेवक बापूराव आणि रूपाली कोळपे या दांपत्याचा प्रथमेश हा मुलगा. रामनगर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीत माध्यमिक तर काकडे महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. सध्या तो बीडच्या जनविकास विद्यालयात बारावीत शिकत आहे. त्याने पानिपत (हरियाना) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात आणि ७० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविण्याचा पराक्रम केला आहे.

पाटोदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने कोल्हापूर, पुणे आणि नाशिक विभागाच्या कुस्तीपटूंना आसमान दाखविले होते. त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सोमवारी (ता. ३) त्याला पहिल्या फेरीत मध्यप्रदेशातील कुस्तीपटूने बाय दिला. दुसऱ्या फेरीत ओरिसाच्या कुस्तीपटूला १०-० असे एकतर्फी नमविले. उपांत्य फेरीत दिल्लीच्या कुस्तीपटूसोबतची कुस्ती बरोबरीत सुटली मात्र निर्णायक कृतीमुळे त्याला विजयी घोषित केले. अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या नामांकित कुस्तीपटूसोबत झालेल्या चुरशीच्या लढतीत ६-४ अशा गुणांनी विजय मिळविला.
विद्यालयीन पातळीवर कबड्डी खेळणाऱ्या प्रथमेशचे पोलिस उपनिरीक्षक मनोज सावंत यांनी गुण हेरले. त्यांच्यासह वाणेवाडीच्या एकता तालीम संघाचे प्रशांत गायकवाड, संग्राम डोंबाळे, चैतन्य यादव, प्रशांत भोसले आदींनी मोफत मार्गदर्शन केले. पुढे मगरवाडीच्या नवनाथ कुस्ती केंद्राचे वस्ताद तानाजीराव सोरटे यांनी निर्णायक पैलू पाडले. काकडे महाविद्यालयाचे प्रा. दत्तराज जगताप यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी त्याला सोमेश्वर कारखाना, क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदींनी मदत केली होती.
प्रथमेश म्हणाला की, प्रतिकूल परिस्थितीतही आईवडिलांनी काही कमी पडू दिले नाही. नवनाथ तालीम, एकता तालीम, काकडे महाविद्यालय, जनविकास विद्यालय यांची मोलाचे मार्गदर्शन झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे व परिस्थिती बदलण्यासाठी चांगली नोकरी मिळविण्याचे स्वप्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com