बारामतीच्या तरुणाईला वृक्षारोपणाचा लळा
गावाचा विकास म्हणजे फक्त भव्य इमारती, भव्य बसथांबे, रस्ते, मॉल, रोषणाई नव्हे; शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पाणी, स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था, तंटामुक्त गाव, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या गोष्टी त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. बारामती तालुक्यात एकीकडे भौतिक सुविधांची उभारणी सुरू असताना दुसरीकडे तालुक्यातील तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्यावरणाकडे, जैवविविधतेकडे अत्यंत गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तालुक्यात काही लाख स्थानिक वृक्षांची लागवड झाली आणि हरीण, लांडगा, कोल्हा, तरस असे दुर्मीळ होत चाललेले प्राणी पुन्हा दिसू लागले आहेत.
- संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यात नीरा- बारामती रस्त्याकडेच्या दीडशे- दोनशे वर्षांच्या तब्बल साडेतीन हजार वृक्षांची प्रशासनाने अक्षरशः कत्तल केली. रस्ता रुंदीकरणासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्याऐवजी वड, पिंपळ, चिंच अशा वृक्षांवर कुऱ्हाड चालविणे त्यांना सोपे वाटले. कऱ्हा नदीच्या जैवविविधतेशी खेळताना अधिकारी मंडळींनी चक्क नदीमध्येच दगड आणि सिमेंटची भव्य बांधकामे करत लाखो वर्षे वाहत असलेल्या नदीचे नैसर्गिक रूप बदलण्याचा अट्टहास दाखविला. त्यामध्ये दुर्मीळ अशी केवडा, कर्दळ यांची बने क्रूरपणे नष्ट केली. ओढा खोलीकरण करताना ओढ्याकडेची झाडे- झुडपे काढून अनेक ओढ्यांना चकचकीत करण्यात आले. या गंभीर चुकांची भरपाई बारामती तालुक्यातील तरुणाई स्वकष्टाने आणि स्वखर्चाने करत आहे.
वनविभागाची मोहीम
सुपे अभयारण्यात माळरान, देशी झाडे, गवताळ डोंगर जपण्याचे काम वनविभागाने केले. सुपे- दंडवाडी पट्ट्यात डोंगरांवर केलेली वृक्षलागवड फळाला आली असून, त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे. या अभयारण्यात प्राणी, पक्षी यांची संख्या वाढल्याने निरीक्षणासाठी वन्यप्रेमींची वर्दळ वाढू लागली आहे. याशिवाय कण्हेरीला अत्यंत भव्य वनउद्यान साकारत आहे. या ठिकाणी मियावाकी पद्धतीचे जंगल संवर्धन केले जात आहे. वाघळवाडी, पणदरे येथील तरुणाईस वृक्षारोपणासाठी वनविभागाने मुबलक जागा उपलब्ध करून दिली आहे.
तरुणाईचे वृक्षप्रेम
बारामतीत पर्यावरणतज्ज्ञ महेश गायकवाड यांनी गेली वीस- पंचवीस वर्षे स्थानिक झाडांची लागवड कशी करावी, जैवविविधता कशी वाढीस लागेल, मधमाश्या व वारुळे कशी जपावीत याबाबत शाळा- शाळांतून, गावा- गावांतून जागृती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणाईचा पूर्णपणे देशी झाडांवर भर आहे. पणदरे ग्रामविकास मंचाने वनविभागाच्या सहकार्याने तब्बल सोळा हजार देशी झाडांची लागवड वनविभागाच्या हद्दीत करत सावित्री वन साकारले आहे. याशिवाय पणदरे गावातही सातशे झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे झाड गेले की पुन्हा लावण्याने सगळी झाडे जिवंत आहेत. उंडवडी परिसरातही ‘कार्य हिच ओळख’ फाउंडेशनने महसूलच्या मदतीने गायरानात सहा हजार देशी वृक्षांची लागवड केली आहे. शेततळे, ठिंबक सिंचन या योजना झाडांसाठी आणल्या आहेत! शिवाय माळरानावरील गवतांना जपत आहेत. प्राधान्याने देशी झाडे, काटेरी झाडे, फुलझाडे, फळझाडे, गवत याचे संवर्धन करतानाच वारूळ, मधमाशी हे टिकविण्यासाठी आटापिटा करत आहेत.
वाणेवाडीचा साद संवाद ग्रुप
वाणेवाडीतील साद संवाद ग्रुपचे कार्यकर्ते गेली सात- आठ वर्षे दर रविवारी गावात जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करत आहेत. आतापर्यंत साडेतीन हजार झाडांची लागवड, निगा आणि वाढ त्यांनी केली आहे. याच वाटेवरून शेजारच्याच मुरूम गावातही ग्रीन फाउंडेशन चालत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही गावात शेकडो झाडांची लागवड केली आहे. सगळ्यात कष्टपूर्वक वृक्षारोपण केले आहे ते मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे यांनी. रोजची सकाळ झाडे लावण्यात आणि त्यांची निगा राखण्यात जाते. गावातील प्रत्येकाचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होतो. यातून कोरडवाहू गावात तीन हजार झाडे लागली आहेत. करंजे गावातही सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्या संकल्पनेतून उजाड माळांवर वृक्षारोपणाची मोहीम सुरू आहे.
सोमेश्वर कारखाना, वाघळवाडीचा उपक्रम
वनविभागाच्या वाघळवाडी गावच्या हद्दीत सोमेश्वर कारखान्याने स्वखर्चाने पाइपलाइन करून पाणी पोहोचविले आहे. तिथे शेततळे बांधून सत्तर-ऐंशी एकरात ठिबक सिंचन केले आहे. यामुळे वाघळवाडी ग्रामपंचायत लोकसहभागातून पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करू शकली. तर वनविभागाने तेहतीस हजार झाडांचे मियावाकी पद्धतीचे वन उभारले आहे. या कामामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिथे वनउद्यानासाठी अडीच कोटींचा निधी दिला आहे. सोमेश्वर कारखान्याने एक एकरात देवराई उभारली आहे तर स्वतःच्या परिसरात हजारो झाडे लावली आहेत.
तालुक्यातील गवताळ डोंगर
तालुक्यात मुढाळे, ढाकाळे, पणदरे, वाकी, चोपडज, मुर्टी, मोरगाव, कारखेल, उंडवडी, सुपे या भागात चुकार झाडे असलेले गवताळ डोंगर आहेत. या डोंगरांची स्वतःची एक जैवविविधता आहे. ती जपण्याचे काम गावोगावचे तरूण करत आहेत. मागील दोन- तीन वर्षात वणव्यांचे प्रमाण चांगलेच घटले आहे.
काही चुकांमधून शिकत तालुक्यातील तरुणाई जैवविविधता जपण्यासाठी धडपडू लागली आहे. गवताळ माळराने जपत आहेत. स्थानिक वृक्षांचीच लागवड करत आहेत. त्यामुळे चिंकारा, ससे, लांडगे, कोल्हे, तरस, साळींदर, उदमांजर यांची संख्या वाढू लागली आहे. नष्ट होत चाललेला लांडगा तालुक्याने जपला आहे.
- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ

