‘सोमेश्वर’कडून सहा लाख क्विंटल साखरनिर्मिती

‘सोमेश्वर’कडून सहा लाख क्विंटल साखरनिर्मिती

Published on

सोमेश्वरनगर, ता. ३१ : सोमेश्वर कारखान्याने ३० डिसेंबरअखेरपर्यंत चाळीस टक्के ऊस संपविला आहे. कारखान्याने पाच लाख ५५ हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले तर सहा लाख १६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के तर आजचा उतारा तब्बल १२.०३ टक्के इतका जिल्ह्यात सर्वोच्च आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
सोमेश्वर साखर कारखान्याने सहा लाख साखर पोती तयार केल्याच्या निमित्ताने जगताप यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, चालू हंगामात चौदा ते साडेचौदा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. त्यादृष्टीने दररोज साडेनऊ हजार टन प्रतिदिन या आजवरच्या उच्चांकी क्षमतेने गाळप करत आहोत. अवघ्या साठ दिवसात साडेपाच लाख टनांपेक्षा अधिक ऊस संपविला आहे. कारखान्याकडे केवळ आडसाली ऊस सात लाख टन इतका उपलब्ध होता. जानेवारीअखेर आडसाली ऊस संपेल. सध्या आडसालीच्या तोडीसोबतच नोव्हेंबर व डिसेंबरमधील खोडवा तोड सुरू केली आहे. दररोज दोन हजार टन खोडवा गाळप करत आहोत. बैलगाडी व डंपिंग यंत्रणेद्वारे नोव्हेंबरचा खोडवा तोडत आहोत तर ऊस तोडणी यंत्राद्वारे (हार्वेस्टर) डिसेंबरचा खोडवा तोडत आहोत. आगामी हंगामासाठीही शेतकऱ्यांनी खोडवा राखावा, असे आवाहन उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केले आहे.

फेब्रुवारीत मिळणार ३४०० रुपये उचल
सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३०० रुपये प्रतिटन दिली आहे. शिवाय फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये विलंबाने तुटणाऱ्या उसासाठी अनुक्रमे १००, २०० व ३०० रुपये प्रतिटन अनुदान देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे फेब्रुवारीत ३४००, मार्चमध्ये ३५०० तर एप्रिलमध्ये ३६०० रुपये उचल मिळणार आहे. तसेच अंतिम दरही उच्चांकी देणार असल्याने शेतकऱ्यांनी सोमेश्वरलाच ऊस घालावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

‘सोमेश्वर’चा साखर उतारा सर्वोच्च असल्याने साखरनिर्मितीत, उपपदार्थनिर्मितीत वाढ झाली आहे. अल्कोहोलनिर्मिती २८ लाख लिटर झाली असून हंगामाअखेर ८० लाख लिटर होईल तर आतापर्यंत तीन कोटी १७ लाख युनिट वीज विक्री केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एकूण सहा कोटी युनिट वीज विक्री केली होती. चालू हंगामात १० कोटी युनिट वीज विक्रीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्वोच्च दराची परंपरा राखण्यात सोमेश्वर मागे पडणार नाही.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्‍वर साखर कारखाना

05212

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com