कोप्यांत पेटले शिक्षणाचे दिवे

कोप्यांत पेटले शिक्षणाचे दिवे

Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पाच वर्षांपूर्वी ‘सोमेश्वर'' कारखान्याने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘कोपीवरची शाळा’ हा अभ्यासवर्ग सुरू केला होता. या शिक्षणयज्ञात पाच वर्षांत २३१२ मुलांना लिहिते-वाचते करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला आहे. रोज सूर्य मावळतीला चाललेला असताना ‘सोमेश्वर’च्या परिसरातील ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमधून बाराखडी आणि पाढ्यांचे स्वर ऐकायला येत आहेत. दिवसभर फडातून थकून-भागून आलेली मुले स्वच्छ होऊन अभ्यासवर्गाला पोहोचत आहेत आणि वहीवरती अक्षरे गिरवत आहेत.
राज्यातील प्रत्येक कारखान्यावर पाच-सहा महिन्यांसाठी ऊसतोड मजूर स्थलांतरित होऊन येतात. मूळ गावी शाळेत असलेली त्यांची मुले स्थलांतरानंतर शाळेबाहेर ढकलली जातात. या वंचित मुलामुलींना शिक्षण देण्याचा सावित्रीबाईंचा वसा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने कोपीवरची शाळा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू ठेवला आहे. २०२१-२२ या हंगामात ३ जानेवारीला याचा शुभारंभ झाला होता. कारखान्याने चालविलेला हा राज्यातील पहिला उपक्रम असून इथे मुले तर शिकतच आहेत पण ऊसतोड मजुरांनाही कारखान्याबद्दल आत्मीयता वाटू लागली आहे. आणि शैक्षणिक साहित्याच्या रूपाने लोकसहभागही मिळत आहे. कारखान्याने नौशाद बागवान, संभाजी खोमणे, आरती गवळी, अश्विनी लोखंडे, अनिता ओव्हाळ, संतोष होनमाने, नितीन मोरे या सात संवेदनशील शिक्षक-कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. सातही जण मनापासून रोज सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत सात अभ्यासवर्ग चालवतात. क्षमतेनुसार मुलांचे गट केले असून त्यानुसार शिक्षण देतात. या अनुभवी शिक्षकांनी आता स्वतःच अभ्यासक्रम तयार केला असून प्रत्येक मुलाला किमान लिहायला आणि वाचायला शिकवायची जिद्द त्यांनी बाळगली आहे.

शिक्षणाशिवाय खूप काही
शालेय मुलांना शिक्षण देतानाच सोबतीला दर आठवड्याला ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबवून खेळ, गाणी, कला घेतल्या जातात. तसेच ० ते ६ वयोगटाचे सर्वेक्षण करून त्यांची यादी आरोग्य व अंगणवाडी विभागाला दिली आहे. त्यांनी सर्व मुलांचे लसीकरण केले आहे. ऊस तोडण्यासाठी सात गर्भवती माता आल्या आहेत. त्यांना आरोग्य केंद्राशी जोडून प्रसूतीपर्यंतची काळजी घेतली जाते. याशिवाय मुलांचे स्नेहसंमेलन, पालक बैठका, चावडीवाचन, पुस्तक पेटी, व्याख्याने, महापुरुषांच्या जयंत्या हेही उपक्रम राबविले जात आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

फक्त १२ जण वाचताहेत
चालू हंगामात केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयोगटाची ४८१ मुले तर ६ ते १४ वयोगटातील (शिक्षण हक्क कायदा लागू असलेली) तब्बल २२५ मुले आढळली! या मुलांची प्राथमिक चाचणी घेतली असता पूर्वतयारीत ९९, मुळाक्षरांत ८५, बाराखडीत ५०, जोडाक्षरांत १९ तर समजपूर्वक वाचनात १२ मुले आढळली. तीन विशेष मुले आहेत. थोडक्यात पहिली ते आठवीच्या सव्वादोनशे मुलांपैकी केवळ बारा मुले वाचतात हे धक्कादायक वास्तव समोर आल्याची माहिती नौशाद बागवान यांनी दिली.

वर्षनिहाय सर्वेक्षणात वयोगटानिहाय आढळलेली मुले
वर्ष ०ते१८ ६ ते १४
२०२१-२२ - ४८१ २७७
२०२२-२३ - ४५९ २२०
२०२३-२४ - ४४४ २०८
२०२४-२५ - ४५५ २१०
२०२५-२६ - ४७३ २२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com