व्यापार करार साखर उद्योगाच्या मुळावर?

व्यापार करार साखर उद्योगाच्या मुळावर?

Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. १४ : भारत-अमेरिका यांच्यातील ‘ट्रेड डील’च्या चर्चेने साखर कारखानेही धास्तावले आहेत. केंद्र सरकारने कृषी उत्पादनांना बाजूला ठेवले असल्याचे सांगितले आहे. मात्र, दोन्ही देशांच्या संयुक्त टीपणीमध्ये ‘स्पिरीट आणि वाइन’चा उल्लेख आहे. स्पिरीट आणि वाईनची आयात झाली तरीही साखर उद्योगाच्या डिस्टिलरींवर संकट कोसळणारच आहे. अंतिमतः याचा ऊस उत्पादक व द्राक्ष उत्पादकांना अंतिम फटका बसणार असल्याचा शेतकरी संघटनांचा दावा आहे.

भारत व अमेरिकेतील व्यापार कराराबाबत नुकतेच संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत या कराराला अंतिम स्वरूप येणार आहे. तत्पूर्वीच शेतीक्षेत्रात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने कृषी, दूध ही क्षेत्रे पूर्णपणे संरक्षित असल्याचे आणि गहू, तांदूळ, मका, इथेनॉल, सोयाबीन, दूध, चीज वगैरे पदार्थांची आयात केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु थेट सोयाबीन आयात न करता सोया ऑइल आयात करणे किंवा मका आयात न करता त्याची पेंड आयात करणे असे छुपे मार्ग स्वीकारले जातील अशी शेती अभ्यासकांना भीती आहे.
दरम्यान, ‘स्पिरीट व वाइन आयात करण्याचा मुद्दा संयुक्त आल्याने साखर उद्योगही धास्तावला आहे. स्पिरीटच्या नावाखाली छुप्या मार्गाने इथेनॉलउद्योगावर हल्ला होणार आहे. भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती होता आणि त्यादृष्टीने साखर उद्योगांनी कर्ज उभारणीतून अल्कोहोलनिर्मितीसाठी प्रचंड यंत्रसामग्री उभारून उद्दिष्ट गाठले. वीस टक्के उद्दिष्टासाठी १५०० कोटी लिटर इथेनॉलची गरज असताना देश १८०० कोटी लिटर निर्मितीपर्यंत पोचला असल्याने इथेनॉल आयातीची गरज नाही.

डिस्टिलरीत मोलासेसपासून पहिल्या टप्प्यात रेक्टीफाईड स्पिरीट तयार होते. पुढच्या टप्प्यात अधिक शुद्ध स्वरूपातील अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल आणि एक्स्ट्रान्युट्रल अल्कोहोलची निर्मिती होते. कारखान्यांचे स्पिरीट व अल्कोहोल औषधे, दारू, केमिकल कंपन्या खरेदी करतात तर इथेनॉल पेट्रोलकंपन्यांना जाते. संबंधित कंपन्यांना स्वस्त स्पिरीट मिळाल्यास किंवा स्पिरीट आणून काही उद्योगांनी इथेनॉल बनविल्यास साखर कारखान्यांचे डिस्टिलरी आणि पर्यायाने ऊस उत्पादक अडचणीत येणार आहेत. वाईनच्या आयातीने द्राक्षउत्पादकांनाही असाच फटका बसणार आहे.

अल्कोहोलचा ४० टक्के ग्राहक मद्यनिर्मिती व औषधनिर्मिती कंपन्या आहेत. साठ टक्के ग्राहक पेट्रोल कंपन्या आहेत. संयुक्त टीपणीनुसार स्पिरीट आयात केल्यास चाळीस टक्के अल्कोहोलचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. आमचा स्पिरीटचा उत्पादनखर्च मात्र प्रतिलिटर ५३ रुपये असून अमेरिकेतून ते स्वस्त मिळू शकेल. ते आयात न करणे उत्तम.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर कारखाना


शेतकऱ्यांची बरबादी निश्चित :- राजू शेट्टी
‘स्पिरीट आणि वाइन आयातीचा उल्लेख आहे. देशातले उद्योग स्पिरीट, वाइन आणून त्यापासून इथेनॉल करतील ना. इथे ६५ रुपये प्रतिलिटर दर आहे तिथून ४५ रुपयांत पोहोच होईल. इथेनॉलमध्ये साखरउद्योगाने ७३ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे ते मोडीत निघेल. त्याच पद्धतीने सोयाबीनचे नाव न घेता सोया तेल आणणार, मक्याचे नाव न घेता मका पेंड आणणार. तसेच स्पिरीटचे. कापूसही वेगळ्या मार्गाने आणून कापड उद्योग मारणार. शेतकरी जागा झाला नाही तर बरबादी निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com