खासगी बाजारातील इथेनॉल, आरएसचे दर घसरले

खासगी बाजारातील इथेनॉल, आरएसचे दर घसरले

Published on

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २४ : केंद्र सरकारने ई-२० धोरणानुसार इथेनॉलच्या उत्पादनाची खरेदी घटविल्यामुळे पेट्रोल कंपन्या इथेनॉलचा मोजकाच कोटा खरेदी करत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी उर्वरित इथेनॉल खासगी बाजारात उतरविले आणि खासगी कंपन्यांची अक्षरशः चांदी झाली. अतिरिक्त उत्पादनामुळे इथेनॉलसह रेक्टीफाईड स्पिरीट (आरएस), एक्स्ट्रान्युट्रल अल्कोहोल (ईएनए) अशा सर्वच उत्पादनांच्या किंमती निचांकी पातळीवर आल्या आहेत. परिणामी चालू हंगामात जुन्या डिस्टिलरींच्या नफ्यात प्रचंड घट होणार आहे तर नव्याने उभारलेल्या किंवा वाढविलेल्या डिस्टिलरी कर्जबाजारी होणार आहेत.
केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामात इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा आणली तेव्हाच डिस्टिलरी प्रथमच तोट्यात गेल्या होत्या. चालू हंगामात एकूण इथेनॉलनिर्मितीच्या क्षमतेपेक्षा पन्नास ते साठच टक्क्यांचा कोटा दिला गेला आहे. वास्तविक साखरनिर्मितीऐवजी डिस्टिलरीचे भविष्य उज्ज्वल राहील असा होरा बांधून थेट उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या डिस्टिलरी उभारल्या. काहींनी जुन्या सी हेवी मोलासेसच्या डिस्टिलरीत सुधारणा करत बी हेवीपासूनची तजवीज केली. खासगी कारखान्यांनी हनुमान उडी मारत थेट तीन ते पाच लाख लिटर प्रतिदिन क्षमतेच्या भव्य डिस्टिलरी उभारल्या. आता त्यांना इथेनॉलनिर्मितीच्या चाळीस ते पन्नास टक्केच कोटा मिळाल्याने गोत्यात आहेत. नव्याने विस्तारीकरण केलेल्या किंवा नव्याने उभारलेल्या डिस्टिलरींचे कर्जाचे हप्तेसुद्धा जाणे मुश्कील झाले आहे. सी हेवी मोलासेसपासून इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या जुन्या डिस्टिलरी तेवढ्या तगून राहणार आहेत.

दरम्यान, अपेक्षित कोटा मिळाला नसला तरी किमान हंगामात तरी इथेनॉलनिर्मिती करावी लागली. कारखान्यांनी पेट्रोल कंपन्यांचा कोटा पुरवून उरलेले इथेनॉल खासगी बाजारात आणले. तसेच आरएस किंवा ईएनएच्या उत्पादनावरही जास्त भर दिला गेला. त्यामुळे हे तिन्ही उपपदार्थांचा महापूर आल्याने केमीकल, औषध व मद्यकंपन्यांची मात्र चांदी झाली आहे.
खासगी बाजारात गतहंगामात प्रतिलिलटर ६० ते ६२ रुपयांपर्यंत आरएस व इथेनॉलचे दर पोहोचले होते. आता तेच दर ५५ ते ५६ रुपये प्रतिलिटरपर्यंत कोसळले आहेत. पेट्रोलकंपन्यांचा रसापासूनच्या इथेनॉलचा दर ६५ रुपये ६१ पैसे प्रतिलिटर तर बी हेवी इथेनॉलचा दर ६० रुपये ७३ पैसे प्रतिलिटर असताना खासगी बाजारातले दर कितीतरी कमी आहेत. त्यामुळे चालू हंगामात प्रत्येकाचाच तोटा निश्चित झाला आहे. शिवाय गतहंगामात साडेतेरा हजार रुपये प्रतिटन असलेला मोलासेसचा दरही १० ते ११ हजार रुपये प्रतिटनावर घसरला आहे.

पेट्रोल कंपन्यांचा इथेनॉलचा दर (वर्गवारीनुसार) - ५७ रुपये ९७ पैसे ते ६५ रुपये ६१ पैसे प्रतिलिटर
खासगी बाजारातील इथेनॉलचे दर - ५५ ते ५६ रुपये प्रतिलिटर
गतहंगामातील आरएसचा दर - ६० ते ६२ रुपये प्रतिलिटर
चालू हंगामातील आरएसचा दर - ५५ ते ५६ रुपये प्रतिलिटर
गतहंगामातील मोलासेसचा दर - १३ हजार रुपये प्रतिटन
चालू हंगामातील मोलासेसचा दर - १० ते ११ हजार रुपये प्रतिटन
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com