काकडे महाविद्यालयात ऐतिहासिक नाण्यांना उजाळा
सोमेश्वरनगर, ता. ६ : येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने ‘ऐतिहासिक नाणी व वस्तूंचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सातवाहन कालापासून ब्रिटिशकालापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक नाणी ठेवण्यात आली होती. तसेच सनद, मोडी व फारसी भाषांचे ऐवजी पाहण्यासाठी उपलब्ध होते. परिसरातील नागरिक व शाळांनीही या प्रदर्शनास भेट दिली.
नेवासा खुर्द (जि. अहिल्यानगर) येथील ‘स्वातंत्र्य सैनिक हाजी इब्राहीम मणियार ऐतिहासिक वस्तू संग्रहालय’ या संस्थेने ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंचे संकलन केले आहे. या संस्थेस पाचारण करून काकडे महाविद्यालयात प्रदर्शन भरविण्यात आले. उद्योजक आर. एन. शिंदे व ''सोमेश्वर''चे संचालक अभिजित काकडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. संस्थेचे संचालक जुबेरभाई मणियार, इसाकभाई मणियार, इतिहास अभ्यासक डॉ. दत्तात्रेय डुबल, प्रा. दत्तात्रेय जगताप आदींनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या प्रदर्शनात सातवाहन, चालुक्य, यादव, सुलतानशाही, मुघल, ब्रिटीश व शिवकालीन अशी ३००० हून अधिक दुर्मिळ नाणी मांडण्यात आली होती. परकीय देशांच्या नोटा, संस्थानांचे स्टँप, विविध पोस्टकार्ड व दुर्मिळ टपाल तिकिटे, मोडी व फारसीतील सनदा, सातवाहनकालीन दगडी जाते, विटा, लाकडी तिजोरी, तांब्याची वजने-मापे, पितळी तराजू इत्यादी वस्तू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पहायला मिळाल्या. या वेळी मराठी भाषा दिनानिमित्त अत्यंत दुर्मिळ आणि जुन्या पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित केले होते. यामध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक पुस्तकांचा समावेश होता. तसेच जुन्या काळातील मराठी भाषेचे रूप स्पष्ट करणारी ऐतिहासिक कागदपत्रे, लिखित पुस्तके, श्लोक, अभंगवाणी हेही प्रदर्शनात मांडले होते. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कर्ष आश्रमशाळा, काकडे विद्यालय यांच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी व परिसरातील तीनशे नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले आणि मणियार बंधूंचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

