

सोमेश्वरनगर, ता. ३१ ः सोमेश्वर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने नव्या क्रीडा संकुलाला ‘अजितदादा क्रीडा संकुल’ असे नाव देण्याचा ठराव कालच (ता. ३० मार्च) केला होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यामुळे या संकुलासाठी क्रीडा विभागाने ५४ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित केला, तसेच शारदानगर, पारवडी आणि ढाकाळे येथील शाळांसाठीही निधी मंजूर करण्यात आला.
दिवंगत नेते अजित पवार यांनी बारामती शहरात अनेक क्रीडा सुविधा तयार केल्या. मात्र, तालुक्याचा पश्चिम भाग याबाबत मागे होता. अजित पवार यांनी या भागातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या दहा हजार विद्यार्थ्यांसाठीचे क्रीडा संकुल व्हावे याकरिता गतवर्षी १५६ कोटी मंजूर केले होते. त्यापैकी ११७ कोटी शासनाकडून तर उर्वरित ३९ कोटी संस्थेने स्वनिधीतून उभारायचे होते. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर संकुलापेक्षाही भव्य आणि अद्ययावत आराखडा आखण्यात आला. अधिकच्या निधीसाठी सीएसआरमधून काही रक्कम मिळवण्यासाठी स्वतः पवार यांनी पुढाकारही घेतला होता. लवकरच या क्रीडा संकुलाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, २८ जानेवारीला त्यांचे अपघाती निधन झाले.
या क्रीडा संकुलाची कागदोपत्री प्रक्रिया शिक्षण मंडळाने पूर्ण केली आणि सोमवारीच संचालक मंडळाच्या बैठकीत या संकुलास ''अजितदादा क्रीडा संकुल'' असे नामकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. आज राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने येथील बंदिस्त प्रेक्षागृहासाठी मंजूर असलेल्या नव्वद लाख निधीपैकी ४१ लाख ५० हजाराचे तर धावण्याच्या पथासाठी मंजूर २७ लाखांपैकी १३ कोटी निधीचे वितरण केले. यामुळे रखडलेले क्रीडा संकुल आता मार्गी लागणार आहे.
सोमेश्वर कारखाना व मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व सचिव भारत खोमणे या वेळी म्हणाले, ‘‘अजितदादा यांच्या स्मरणार्थ कालच संचालक मंडळाने या मैदानाचे नामकरण केले. उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्रिपदी असलेल्या सुनेत्रा पवार यांनी आमच्या क्रीडा संकुलास निधीची मदत करीत बारामतीवर लक्ष असल्याचे दाखवून दिले. प्राथमिक तयारी झाली असून पुढील पंधरा दिवसांतच टेंडर प्रक्रिया पार पाडली जाईल.’’
बारामतीकरांच्या अनेक कामांना निधी
बारामतीतील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर संस्थेस हॉकी मैदानासाठी २७ लाख व धावण्याच्या पथासाठी १३ लाख निधीचे वितरण केले आहेत. तर, पारवडीच्या भैरवनाथ विद्यालयाचे रखडलेले पाच लाख ८० हजारांचे अनुदान आणि ढाकाळे येथील विद्यालयाच्या क्रीडा सुविधेसाठी १० लाख ५० हजार निधीचे वितरण आज झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.