

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २० : राज्यातील सुमारे दीडशे कारखान्यांचा साखर हंगाम फेब्रुवारीअखेर, तर उरलेल्यांचा मार्चअखेर संपला होता. मात्र, आता निम्मा एप्रिल सरला तरीही राज्यातील शेतकऱ्यांची २१३० कोटींची देणी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल ११७ कारखान्यांनी फक्त साठ टक्क्यांपर्यंतच एफआरपी अदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साखर आयुक्तालयाने १५ एप्रिलपर्यंतचा उसाच्या एफआरपीचा (रास्त व उचित मूल्य) अहवाल जाहीर केला आहे. राज्यात चालू हंगामात २०९ कारखाने सुरू झाले होते आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एकरकमी एफआरपी ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना एकरकमी देणे बंधनकारक होते. परंतु, फारच थोडे कारखाने हे बंधन पाळू शकले आहेत. राज्यात १०४२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, तोडणी- वाहतूक खर्चासह ४० हजार कोटी रूपये, तर तोडणी- वाहतूक खर्चाशिवाय ३० हजार कोटी रूपये एफआरपी शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक होते. अद्यापही २ हजार कोटी एफआरपी थकीत आहे. राज्यातील बहुतांश कारखाने उसाअभावी फेब्रुवारीअखेर बंद झाले. पन्नासेक कारखान्यांचा हंगाम मार्चमध्ये गेला होता. त्यामुळे वास्तविक मार्चअखेरच बहुतांश कारखान्यांची एफआरपी पूर्ण होणे आवश्यक होते. आतापर्यंत केवळ ९२ कारखान्यांनी १०० टक्के; तर ८४ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी अदा केली आहे. उरलेल्या १४० कारखान्यांची प्रचंड प्रमाणात एफआरपी थकली आहे. अनेक बड्या उद्योगपतींच्या कारखान्यांचा यात समावेश आहे.
नुकतीच साखर आयुक्तालयाने सर्वाधिक थकबाकी असलेल्या ५३ कारखान्यांना नोटीस बजावून सुनावण्या घेतल्या आहेत. सरकारी पातळीवर कारखानदारीच्या प्रश्नांबाबत प्रचंड अनास्था असल्याने मोठ्या प्रमाणात कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. एफआरपीच्या तुलनेत साखरेसह वीज, इथेनॉल या उपपदार्थांचे दर वाढणे आवश्यक आहे.
तोडणी- वाहतूक खर्चासह एफआरपी आकडेवारी
देय एफआरपी- ४० हजार ३२७ कोटी रुपये
एफआरपी अदा- ३८ हजार १९७ रुपये
थकीत एफआरपी- २१३० कोटी रुपये
टक्केवारीनुसार एफआरपी अदा करणारे कारखाने संख्या
एकूण कारखाने- २०९
१०० टक्के एफआरपी- ९२
८० ते १०० टक्क्यांपर्यंत- ८४
६० ते ८० टक्क्यांपर्यंत- २३
० ते ६० टक्क्यांपर्यंत- ११७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.