

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ६ : केंद्र सरकारने सन २०२६-२७ हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये (रास्त व उचित दर) प्रतिटन शंभर रुपयांची नाममात्र वाढ केली आहे. राज्यातील शेतकरी संघटनांनी या दरवाढीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या मशागत, खते- औषधे, मजुरी या सगळ्यात खर्चात मोठी वाढ झालेली असताना एफआरपीची वाढ २.८१ टक्के इतकीच आहे. त्यामुळे ‘ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे’ अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांनी व्यक्त केल्या आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उसाच्या एफआरपीत सन २०२४-२५साठी २५० रुपये तर २०२५-२६ साठी १५० रुपये प्रतिटन वाढ दिली होती. येणाऱ्या हंगामासाठी मात्र १०.२५ टक्के पायाभूत उताऱ्यासाठी ३५५० रुपयांहून ३६५० रूपये प्रतिटन, तर त्यापुढील एक टक्का उताऱ्यासाठी ३५६ रूपये प्रतिटन, अशी वाढ केली आहे. अशी तोकडी दरवाढ देताना उसाचा उत्पादनखर्च मात्र १८२० रूपये प्रतिटन असल्याचा दावा कृषी मूल्य आयोगाने केल्याने शेतकरी नेते संतप्त झाले आहेत.
शेतीच्या भांडवलात मोठी वाढ होत असून, हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. कारखान्यांचे साखर उतारे घटत आहेत. त्यामुळे उसाची एफआरपी परवडेनाशी झाली आहे. अशात एफआरपी देताना तोडणी वाहतूक खर्च वजा करावा लागतो. एफआरपीच्या तुलनेत तोडणी खर्च वाहतूकही त्याच पटीत वाढल्याने अंतिमतः एफआरपीमध्ये फारशी वाढ दिसून येणार नाही.
एफआरपीमध्येही किमान तीनशेची अपेक्षा असताना शंभरावर बोळवण म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याचा प्रतिटन १८२० रूपये उत्पादनखर्च सरकारने दाखवला असून, तो कुठल्या संशोधन केंद्रात काढला हे दाखवा.
- राजू शेट्टी, नेते, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे
ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. खते, डिझेल, मशागत, मजुरी या सगळ्याच दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिटन चारशे रूपये वाढवावेत, अशी आमची मागणी होती.
- उमेश देशमुख, राज्याध्यक्ष, किसान सभा
शेतकऱ्याचा उत्पादनखर्च तीन हजार रूपये प्रतिटन झालाय. जी एफआरपी देऊ केलीय, त्यातून तोडणी वाहतूक वजा केले तर हाती काहीच राहात नाही.
- रघुनाथ पाटील, नेते, शेतकरी संघटना
म
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.