‘सोमेश्वर’चा पुरातन वारसा पुस्तकाद्वारे उजेडात

‘सोमेश्वर’चा पुरातन वारसा पुस्तकाद्वारे उजेडात
Published on

सोमेश्वरनगर, ता. ८ ः लोकदैवत भगवान शिवाचे वसतिस्थान असलेले सोमेश्वर मंदिर हा स्थानिक लोकसंस्कृतीचा पुरातन वारसा आहे. या मंदिराचा मागे पडलेला अपरिचित इतिहास पुढे आणण्याचे काम ‘सोमेश्वर : लोकसंस्कृतीचा महानायक’ या ‘सकाळ’ प्रकाशित पुस्तकाने केले आहे. हे पुस्तक परिसराचा सांस्कृतिक-ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असे प्रतिपादन सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
सोमायाचे करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थानावर आधारित ‘सोमेश्वर : लोकसंस्कृतीचा महानायक’ हे पुस्तक दै. सकाळने ग्रामसमृद्धी उपक्रमांतर्गत प्रकाशित केले असून लेखन, संशोधन बातमीदार संतोष शेंडकर यांनी केले आहे. तर मगरवाडी येथील उद्योजक संतोष कोंढाळकर व सुनीता कोंढाळकर या दांपत्याने निर्मितीसहाय्य केले आहे. शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य राखून सदर पुस्तकाचे प्रकाशन पुरुषोत्तम जगताप व जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी डॉ. मनोज खोमणे, रूपचंद शेंडकर, भाऊसाहेब हुंबरे, कांचन निगडे, बाळासाहेब शिंदे, भारत खोमणे, डॉ. मनोहर कदम, सचिन भांडवलकर, विपुल भांडवलकर, रमेश शिंदे, वैभव गायकवाड, महेश जगताप, शशिकांत जेधे, नितीन शेंडकर, निखिल शेंडकर, प्रदीप भापकर, प्रा. दत्तात्रय जगताप, निखिल भापकर उपस्थित होते.
जगताप म्हणाले, मंदिराचा पहिला जिर्णोद्धार पेशवेकाळात झाला होता. त्यानंतर तीनशे वर्षांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः लक्ष घालून विकास केला. सोमेश्वर कारखान्यानेही मंदिराच्या विकासात योगदान दिले असून सभासद प्रतिटन एक रूपया गेली तीन-चार वर्षे देत आहेत.
संभाजी होळकर यांनी, प्रत्येकाला आपल्या गावाचा, परिसराचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा असते. सोमेश्वर देवस्थानाबद्दलची जिज्ञासा सदर पुस्तकामुळे पूर्ण होणार आहे, असे मत मांडले.
संतोष कोंढाळकर व देवस्थानचे अध्यक्ष अनंता मोकाशी यांनी स्वागत केले. ॲड. गणेश आळंदीकर यांनी प्रास्ताविक केले. तर राणी शेंडकर यांनी आभार मानले.


भगवान शिवापासून ते सोमेश्वरापर्यंत आध्यात्मिक प्रवास, सण-यात्रांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. तसेच सोमेश्वर मंदिराचा शिवकाळातील, पेशवेकाळातील इतिहास, भांडवलकरांचा इतिहास, गोतसभा, न्यायनिवाडा, पेशव्यांचा मुक्काम तसेच ब्रिटिशकाळातील अभ्यासकांनी केलेल्या नोंदी याचाही परामर्श घेतला आहे. मंदिरातील शिल्पकला, वास्तूकला, तीर्थाची बारव, विरगळ, पोर्तुगीज घंटा याच्या नव्याने नोंदी प्रथमच घेतल्या आहेत.

GRAAM@Graamdigital या युट्यूब चॅनेलवर मंदिराबाबतचा माहितीपट पाहण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com