कृषिपंप सुरूच होऊ न देण्याचा जलसंपदाचा चंग
शेटफळगढे, ता.३ : इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याला पाणी येताच जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीच्या मदतीने कृषिपंप सुरूच होऊ न देण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे शेटफळगढे, सणसर परिसरात खडकवासला कालव्याचे पाणी असूनही शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड बनले आहे.
रब्बी हंगामात केवळ इंदापूर तालुक्याला अर्धा टीएमसीही पाणी मिळाले नाही. आता कालव्याला पाणी येताच कालव्यावरील विद्युत पंप चालू न देण्याची भूमिकेमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे. तालुक्यातील टेलच्या भागाला पाणी पोचविण्यात प्रयत्नात पिके सुकू लागली आहेत.
खडकवासला कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन उन्हाळीच असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून स्पष्ट होत आहे. कालव्यातून आवर्तन सुरू होताच इंदापूर तालुक्यातील रोहित्र बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला आहे.
खडकवासला कालव्यातून शेतीसाठी १८ फेब्रुवारी रोजी पाणी सोडले आहे. चालू वर्षी कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्याने जलसंपदा मंत्री यांच्या परवानगीने हे आवर्तन सोडले आहे.
तालुक्यात पाणी आल्यापासून हे पाणी उन्हाळी हंगामातील असल्याचा दावा काही शेतकरी करीत होते. तर काहीजण हे आवर्तन रब्बीतील असल्याचे सांगत असल्याने अनेक शेतकऱ्यांत संभ्रम होता. मात्र कालव्यालगत असलेले विद्युत पंप बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता लेखी आदेश काढला आहे. त्यामध्ये मात्र स्पष्टपणे उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने नमूद केलेले उन्हाळी की रब्बी हा संभ्रम मात्र दूर झाला आहे.
यंदाही सणसर जोड कालव्याला पाणीच नाही
सणसर जोड कालव्याला यंदाही पाणी मिळण्याचे नियोजन नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून सन १९९३ च्या दरम्यान जोड कालवा तयार करण्यात आला. यावर सुमारे ११ हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. या शेतीसाठी खडकवासला धरणातून ३.९० टीएमसी एवढे पाणी आरक्षित केले आहे. मात्र, हे पाणी खरीप आणि रब्बी हंगामात देण्याचे नियोजन प्रकल्पाच्या तरतुदीमध्ये आहे. मात्र गेले अनेक वर्षापासून जोड कालव्याला पाणीच दिले नाही आणि आता उन्हाळी आवर्तनात तरतूद च केली नाही त्यामुळे या सुमारे ११ हजार हेक्टर शेतीसाठी पाण्याचे नियोजन काय? असा सवालही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे
असे मिळणार शेतीसाठी कालव्यातून आवर्तन
खडकवासल्यातून १८ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन २० एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आवर्तन एकूण ६० दिवस चालणारा असून या आवर्तनात सहा टीएमसी पाणी शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे. उन्हाळी हंगाम एक मार्चपासून सुरू होत असतो. कालव्याला पाणी १८ फेब्रुवारीला सोडले असले केवळ रब्बी हंगामातील दहा दिवसाचा कालावधी आहे उर्वरित कालावधी हा उन्हाळी आवर्तनातील असल्याने उन्हाळी आवर्तन संबोधले जाणार आहे.
आवर्तनाचा सर्वाधिक कालावधी हा उन्हाळी हंगामातील असल्याने हे आवर्तन उन्हाळीच असे संबोधले जाणार आहे. आवर्तनाव्यतिरिक्त दुसऱ्या आवर्तनासाठीही तीन टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. मात्र सणसर जोडकालव्यासाठी चालू आवर्तनात नियोजन केले नाही.
- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता खडकवासला प्रकल्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

