काऱ्हाटीला अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेत एक कोटीचे बक्षीस

काऱ्हाटीला अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेत एक कोटीचे बक्षीस
Published on

सुपे, ता.१५ः काऱ्हाटीच्या (ता. बारामती) ग्रामस्थांनी गावचा दुष्काळ कायमचा पुसण्यासाठी एकजुटीची वज्रमुठ बांधली. गावच्या परिसरात मृद व जलसंधारणांची कामे केली. या मेहनतीमुळे अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत गावाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे एक कोटी रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह मिळाले. या सन्मानचिन्हाची ग्रामस्थांनी मोठ्या अभिमानाने ट्रॅक्टरमधून शनिवारी (ता.१४) रात्री मिरवणूक काढली होती. या वेळी गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
गणेशोत्सव, शेतात बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात हातघाईला आलेली असताना अशा कामांतून वेळ काढून अबालवृद्धांसह तरुण व महिला वर्ग पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-लेझीमच्या तालावर महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी नृत्याचा ठेका धरला होता. फुगड्या खेळत, फेर धरून महिलांनी आनंद द्विगुणित केला.
स्पर्धेसाठी ज्यांचे मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली होती. चौकाचौकात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अटल भूजल पथकातील सदस्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
मिरवणुकीत पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, संजय साबळे, हृषिकेश पवार, वैभव भापकर, प्रशांत जगताप, अजय बनसोडे, कृषी सहायक देविदास लोणकर, अटल भूजल पथकातील ज्येष्ठ कार्यकर्ते के.एस.लोणकर, के.के.वाबळे, टी.बी.चांदगुडे, गजानन लोणकर, विठ्ठल जाधव, वसंत जाधव, राजेंद्र जाधव आदींसह अटल भूजल पथकातील सुमारे ५० स्थानिक सदस्य प्रमुख ग्रामस्थांसह सहभागी झाले होते. उपस्थित अधिकाऱ्यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.
पाण्याची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. शेतीसाठी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. सुक्ष्म सिंचनासारख्या उपकरणांचा वापर केला पाहिजे. अशी अपेक्षा पृथ्वीराज लाड यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी सरपंच दीपाली लोणकर, उपसरपंच स्वाती जाधव, सदस्या उज्ज्वला खंडाळे, शारदा चांदगुडे, रेखा लोणकर, प्रमिला सोनवणे, विजय चांदगुडे, अक्षय भंडलकर, गणेश शिंदे, दीपाली हिरवे आदी उपस्थित होते.

सकाळ रिलिफ फंडाच्या कामाचे कौतुक
गावात ओढा व तलाव खोलीकरण, बांध-बंदिस्ती, सिमेंट बंधारे, रिचार्ज शाफ्ट अशी मृद व जलसंधारणांची सुमारे साडेतीन कोटींची कामे झाली. यामध्ये सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाच्या कामाने चांगली सुरुवात केली. काळाच्या ओघात नाहीसे झालेले ओढ्याचे अस्तित्व सकाळच्या कामामुळे पुन्हा दिसू लागले. पाणीसाठा वाढल्यामुळे शेतीलाही फायदा झाल्याची माहिती कार्यकर्ते गजानन लोणकर यांनी प्रास्ताविकात बोलताना दिली. कमी पाण्यावरील शेतीसाठी अॅग्रोवन व सकाळमधील लेख व बातम्यांचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून दैनिक सकाळच्या कामाला दाद दिली.

01879

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com