रांजणगाव एमआयडीसीची वेगवान घोडदौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव एमआयडीसीची वेगवान घोडदौड
रांजणगाव एमआयडीसीची वेगवान घोडदौड

रांजणगाव एमआयडीसीची वेगवान घोडदौड

sakal_logo
By

रांजणगाव एमआयडीसीची वेगवान घोडदौड

ज्या शिरूर तालुक्यावर कायमच दुष्काळी असल्याचा शिक्का बसला होता आणि जेथील जमिनीतून जिरायती पिकांशिवाय फारसे काही हाती लागत नव्हते, त्या माळरानस्वरूप जमिनीला चासकमानसह डिंभे धरणाचे पाणी मिळाले आणि इथली शेतशिवारं फुलली. इतकेच नव्हे तर वांझ म्हणून हिणवल्या गेलेल्या या जमिनीवर उद्योगाचे जाळे उभे राहिले आणि गावगाड्यात सुबत्ता नांदू लागली. एकेकाळी ज्या जमिनीवर अक्षरशः कुसळ सोडून दुसरं काही उगवत नव्हतं, त्या भूमीवर येत्या वर्षभरात उभ्या राहणाऱ्या उद्योगांतून कॉम्प्युटर, लॅपटॉपबरोबरच चक्क मोबाईलसुद्धा बनणार आहे.

- नितीन बारवकर, शिरूर

महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणानुसार सन १९९०च्या दरम्यान ग्रामीण भागात औद्योगिकरणाला अधिकाधिक प्राधान्य देत औद्योगिक वसाहती उभारण्याला सुरवात झाली. पुणे जिल्ह्यात तर तालुका तिथे ‘एमआयडीसी’चे धोरण हाती घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपतीसह, इंदापूर, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, खराडी येथे एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिकरणाला चालना मिळाली. रांजणगावसह इंदापूरच्या एमआयडीसीला तर पंचतारांकित एमआयडीसीचा दर्जा दिला गेला. सन १९९० ला रांजणगाव ‘एमआयडीसी’च्या पहिल्या टप्प्यासाठी रांजणगावसह, कारेगाव व ढोक सांगवी येथील २३०० एकर जमीन संपादित करण्यात आली. सन १९९२ पर्यंत ही प्रक्रीया पार पडल्यानंतर डोंगराळ भूभागाचे सपाटीकरण करून उद्योगांना निमंत्रित केले गेले. त्यादरम्यान ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर मुंबई एक्सप्रेसनंतर सर्वप्रथम पुणे-नगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले. त्यामुळे दळणवळण वाढले. पुण्यापासून जवळ, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे व इतर जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती, अशा रांजणगाव एमआयडीसीकडे अनेक देशी-विदेशी उद्योग आकृष्ट झाले. सन १९९५ पर्यंत जमीन सपाटीकरण, अंतर्गत रस्ते, पदपथावरील दिवे, पाणी योजना आदी सुविधा उभ्या करण्यात आल्या. त्यानंतर सन १९९७-९८ ला ‘अपोलो टायर्स’च्या निमित्ताने पहिल्या उद्योगाची रांजणगाव एमआयडीसीत एन्ट्री झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्हर्लपूल, व्हील्स इंडिया, हरित ग्रामर हे मोठे उद्योग आले, तसे एमआयडीसीचा विस्तार आणि वर्दळही वाढली.

पुणे-नगर हायवेच्या रुंदीकरणाचा जसा फायदा रस्त्याकडेच्या गावांना झाला, तसा तो सर्वाधिक रांजणगाव एमआयडीसीच्या उत्कर्षास झाला. एमआयडीसीत छोट्या-मोठ्या उद्योगांचे जाळे उभे राहात असतानाच सन २००४ च्या दरम्यान ‘एलजी’ या होम अप्लायन्सेस उत्पादनातील आघाडीचा प्रकल्प आला आणि त्यासोबत त्या उद्योगाला कच्चा माल व इतर सुटे भाग पुरविणारे लहान-मोठे चाळीस उद्योग एकाचवेळी उभे राहिले आणि तेथून या एमआयडीसीची खऱ्या अर्थाने वेगवान घोडदौड सुरू झाली. त्याचसोबत आलेल्या व्हर्लपूलने या घोडदौडीत मोलाची भर घातली.

फियाट, करारो इंडिया, व्हील्स इंडिया या वाहन उद्योगातील कंपन्यांच्या आगमणानंतर एमआयडीसीची चाके अधिक वेगाने पळू लागली. त्याचदरम्यान, ब्रिटानिया, आयटीसी, पेप्सिको या फूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या प्रकल्पांमुळे सर्वच क्षेत्रांची पावले या एमआयडीसीकडे वळू लागली. त्यापाठोपाठ थ्री एम, फ्रेजिनियस काबी या सलायन व मास्क बनविणाऱ्या जागतिक दर्जाच्या उद्योगांमुळे या एमआयडीसीचे जागतिक स्तरावर नाव झाले. एका बाजूला ॲटोमोबाईल, फूड, होम अप्लायन्सेस, वाहन व त्याच्याशी रिलेटेड उद्योग उभे राहात असताना हिंजवडी मान व खराडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क उभे राहिले. बेंगलोरच्या जागतिक आयटी पार्कनंतरचा सर्वात मोठा आयटी पार्क म्हणून हिंजवडीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. हे घडत असताना तळेगाव दाभाडे व चाकण येथेही जागतिक दर्जाचा ॲटोमोबाईल पार्क उभा राहिला. महिंद्रा, वॉक्सवॅगन, जनरल मोटर्स, जेसीबी यासारख्या मोठ्या कंपन्या तेथे स्थानापन्न झाल्या.
रांजणगाव एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यासाठी २३०० एकर; तर दुसऱ्या टप्प्यासाठी कारेगाव, बाभुळसर येथील चारशे एकर जमीन संपादित करण्यात आली. आता या दोन्ही टप्प्यांतील औद्योगिकरणावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पन्नास मोठ्या प्रकल्पासह तब्बल सहाशे लहान-मोठे उद्योग उभे आहेत. या दोन्ही टप्प्यात
आता नव्या उद्योगांना जागा शिल्लक राहिलेली नाही. सुमारे ७५ हजार कंत्राटी कामगारांसह तब्बल एक लाखावर कामगार या औद्योगीकरणात कार्यरत असून, हायर या एकाच मोठ्या प्रकल्पात पाच हजारावर कामगार काम करतात. बहुतांश कंपन्या तीन शिफ्टमध्ये चालतात. त्यामुळे उत्पादनाच्या दृष्टीनेही या एमआयडीसीतील प्रकल्प खूपच पुढे गेले आहेत. या औद्योगिकरणातून अनेक स्थानिक कामगारांनाही वैविध्यपूर्ण कामांच्या संधी प्राप्त झाल्या असून, अनेकांना एमआयडीसीत व्यावसायिक प्लॉट मिळाल्याने त्यांनी त्यावर मोठ्या प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या व सुट्या भागांचे प्लांट उभे केले आहेत. या दोन फेजमधील सहाशे उद्योगांपैकी काही अपवाद वगळता सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहेत. त्यामुळे प्रॉडक्ट ग्रोथ ९५ टक्केच्या पुढे आहे.
विविध ब्रॅंण्डच्या मोटारींसह टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, सलायन, मास्क, चिप्स, बिस्किटे, सिगारेट व इतर सर्वच प्रकारच्या उत्पादनांनी उद्योगाचे मोठे जाळे निर्माण झाले असून, या उद्योगांच्या अनुषंगाने परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. हॉटेल, लॉज, किराणा व इतर अनेक व्यवसाय भरभराटीला आले आहेत.

रांजणगाव एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत कर्डे-सरदवाडी घाटानजीक तीनशे हेक्टरवर इलेक्टॉनिक हबला राज्य सरकारने मंजूरी दिली असून, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उत्पादनांच्या उद्योगांतून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या वर्षभरात होणार आहे. या इलेक्ट्रॉनिक हबच्या माध्यमातून सुमारे दोन हजार कामगारांना विविध नोकरीच्या संधी निर्माण होणार असून, त्यांच्यातील कौशल्याला वाव मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या प्रकल्पाला पायाभूत सुविधा पुरविणार असून, आयएफबी या १३० हेक्टरवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पाचे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्टेरिऑनच्या दुसऱ्या शाखेसाठी १७ हेक्टर क्षेत्र देण्यात आले असून, त्यांचेही काम सुरू झाले आहे. येत्या वर्षभरात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक व संबंधित उद्योगांचे जाळे फूल फ्लेजने उभे राहील, असे नियोजन राज्य सरकार, एमआयडीसी व स्थानिक प्रशासनाने केले आहे. या तिसऱ्या टप्प्यातील विकसित प्लॉट स्थानिक उद्योजक, व्यावसायिक व कौशल्याधारित तरुणांना दिले जाणार असून, त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने याच ठिकाणच्या उद्योगांना मिळतील, अशी उद्योगाची साखळी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार येथील इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणाशी संबंधित लोकांना मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्लॉट देताना प्राधान्य दिले जाणार आहे. बाहेरून कुठूनतरी आणून जोडणारांसाठी प्लॉट न देण्याची एमआयडीसीची भूमिका आहे. यातून या प्रकल्पाचा उद्देशच हा आहे की, आपल्या देशात आपली उत्पादने निर्माण झाली पाहिजेत. लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलसह मेडिकल लॅब मध्ये लागणारे इक्विपमेंट इथले इथे बनविले जावे, हा मुख्य उद्देश आहे. छोटे उद्योग आपल्याकडे उत्पादने बनवून ते बाहेर पाठवीत होते. ते आता बाहेरचे उद्योग आपल्याकडे यायला चालू होतील, असा एमआयडीसीचा मानस आहे.
रांजणगाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून, तेजी-मंदीचा फारसा परिणाम त्यांच्यावर होत नसल्याने गेल्या २५ वर्षात कुठलाही उद्योग मंदीमुळे बंद पडला, असे एकही उदाहरण येथे नाही. नाही म्हणायला तत्कालिक परिस्थितीचा काहीसा परिणाम जाणवतो, परंतु तो तेवढ्यापुरताच असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

परिसराचा चेहरामोहरा बदलला
रांजणगाव एमआयडीसीमुळे रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, बाभूळसर खुर्द, कर्डेलवाडी, सरदवाडी, कर्डे या गावांबरोबरच वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलला असून, गावगाड्यातील या गावांत आमूलाग्र सुधारणा झाल्या आहेत. या गावांत सुबत्ता आली आहे. स्थानिकांना रोजगारासह उद्योग धंद्याच्या अनेक संधी निर्माण झाल्याने अर्थकारण सुधारले असून, उंची वस्त्रप्रावरणांसह स्थानिकांची लाइफ स्टाईलही सुधारली आहे. गावपातळीवरील विकासाला चालना देणारे हे औद्योगीकरण ग्रामोन्नतीलाही हातभार लावणारे ठरले आहे. एमआयडीसीतील व्यापार उदीमाचा फायदा अनेक स्थानिकांना झाला असून, शेतशिवारात अनेकांचे टुमदार बंगले उभे राहिले आहेत. ज्या लोकांचे पूर्वी बैलगाडी व नंतरच्या टप्प्यात एसटी बस हेच एकमेव प्रवासाचे साधन होते, त्या लोकांच्या बंगल्यासमोर प्रत्येकाला एक या प्रमाणे दुचाकी; तर लांबच्या प्रवासासाठी आलिशान मोटारी उभ्या राहिल्या आहेत.