शिरूरजवळ व्यापाऱ्याला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरजवळ व्यापाऱ्याला लुटले
शिरूरजवळ व्यापाऱ्याला लुटले

शिरूरजवळ व्यापाऱ्याला लुटले

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : शिरूर शहराजवळ मोटार पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला थांबलेल्या व्यापाऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवीत त्यांच्या अंगावरील सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला.
याबाबत धन्यकुमार मदनलाल बरमेचा (रा. केडगाव, जि. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी (ता. ५) पहाटे तीनच्या सुमारास बरमेचा हे आपल्या कुटुंबीयांसह कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेथून परतताना शिरूर बाह्यवळणाजवळील ‘नमो फर्निचर’ या दुकानाजवळ मोटारीचा (क्र. एमएच १६ सीवाय ९९२९) टायर पंक्चर झाल्याने ते थांबले. टायर बदलत असतानाच पुणे बाजूकडून दुचाकीवर तीन चोरटे कोयते नाचवीत आले. २५ ते ३० वयोगटातील आणि मफलरने चेहरे झाकलेल्या या चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून बरमेचा व त्यांच्या कुटुंबियांकडील मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, असे सोन्याचे दागिने तसेच डायमंडचे पदक व दहा हजार रुपये रोख, असा मिळून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पळून गेले.
या प्रकाराने घाबरल्याने बरमेचा हे तक्रार न देता नगरला निघून गेले. त्यांनी शुक्रवारी उशिरा फिर्याद दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेची गंभीर दखल घेत शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकामार्फतही चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.